१.
नात्यात एक अपुल्या साधा करार ठेवू
हातात हात ठेवू प्रीती अपार ठेवू
दुःखास पाहुनी जर रडलो उगाच आपण
सोसेल काळजाला तितकाच भार ठेवू
डोळ्यात बोलणारी आहेत आसवेही
डोळ्यात तेल घालू डोळे तयार ठेवू
न्यायालयात त्यांच्या खोटा करार चालू
आश्वासने नकोशी शब्दांत धार ठेवू
माखून टाकले मी रक्तात हात माझे
नेण्यास देह त्यांचा खांदेच चार ठेवू
थोडे जगावयाचे होते मला इमानी
आयुष्य व्यर्थ झाले आता उधार ठेवू
मी ढाळलेत अश्रू चिंतेमधे तिच्याही
आता उगाच का मी दावे हजार ठेवू
२.
रणांगणामधे मला लढायचे अजूनही
रणात जिंकण्यास मज, झटायचे अजूनही
नकोस दाखवू मला कधीच वाट चोरटी
बराच वेळ मज इथे, झुरायचे अजूनही
मनातले तुझ्या खरे, तुझ्याकडेच ठेव तू
रणात डावपेच ओळखायचे अजूनही
तुझ्याच पिंजऱ्यात 'तू ' रहायचे शिकून घे
युगे युगे इथे मला उडायचे अजूनही
नसानसात वाहते नवीन दुःख रोजचे
उदास पापण्यातुनी कळायचे अजूनही
चिता जळूनही अता कशास राख जाळतो
जळून देह आतला जळायचे अजूनही
असा कसा ठराव मांडलाय जिंकण्यास तू
लढून जिंकणे तरी, हरायचे अजूनही
..........................................पवन तिकटे
सिंदखेड राजा
7350942506
No comments:
Post a Comment