१.
तुला सारखा आठवू लागतो मी
खुळ्यासारखा का असा वागतो मी !
जिथे भेटलो आजवर कैकवेळा
तुला त्याच गर्दीमधे शोधतो मी
कितीदा तुला पत्र घेतो लिहाया
कितीदातरी मायना खोडतो मी
चुका त्याच त्या रोज करतो नव्याने
मनाला जरी मोडता घालतो मी
तुझी आठवण ओसरू लागल्यावर
नव्याने मला सावरू पाहतो मी
२.
काळ काहीसा थबकल्यासारखा
काळजाचा ठाव चुकल्यासारखा
शक्यता नाही उभारी यायची
मी असा आतून विझल्यासारखा
आणले अवसान मी उसणे पुन्हा
वागलो मी धीट असल्यासारखा
व्यापले आहेस माझे विश्व तू
एक मी कोठेच नसल्यासारखा
आठवत होते मला काहीतरी...
चेहरा केला विसरल्यासारखा
मी तुला कळणार नाही फारसा
पण तुला वाटेल कळल्यासारखा
घालतो आहे मनी घिरट्या किती !
एक माझा शेर फसल्यासारखा
३.
बदल नवा चांगलाच आहे
त्यात तुझा फायदाच आहे
अजूनही मी तसाच आहे
तुझाच होतो तुझाच आहे
वाटेवर वाटांची गर्दी
नवीन हा सापळाच आहे
अनोळखी नाही घरभेदी
कुणीतरी आतलाच आहे
उफाळून आलाय नव्याने
वाद तसा हा जुनाच आहे
लोक उद्या म्हणतील मलाही...
असाच आहे... तसाच आहे !
प्रभाव टाकू शकतो आपण
दबावगट आपलाच आहे
ससेमिरा दु:खाचा मागे
मला तसा वारसाच आहे
अर्ध्यावरही आलो नाही
अजून पल्ला बराच आहे
वाह वाह निशांतजी.. गझला छानच!
ReplyDeleteविजयानंद जोशी
ReplyDeleteमनापासून आभार, सर
ReplyDelete