पाच हझला : कालिदास चावडेकर

१.

जात असताना हटकले, वाद मी घालू कशाला
हात थोडेसे झटकले, वाद मी घालू कशाला

बोलणे फटकळ जरासे, जीभ थोडी सैल माझी
बोललो जे जे खटकले, वाद मी घालू कशाला 

खूप याहूनी भयंकर रेसिप्या त्या बनवलेल्या
तोंड दाबूनी गटकले, वाद मी घालू कशाला

संयमाने आजवर मी पाळले संकेत काही
पण जरी आता सटकले, वाद मी घालू कशाला

चारचौघांच्याच देखत हाय! मिरवत घातलेले
लोढणे आता लटकले, वाद मी घालू कशाला

आवराआवर घराची करित असतानाच आली
मित्र कोणी ना अटकले, वाद मी घालू कशाला

जिंदगीची काय गॅरेंटीच नाही राहिलेली
खोल नेऊनी पटकले, वाद मी घालू कशाला

          
२.

गुप्त होती ठेवलेली 'घेतल्याची' बातमी
व्हायरल झाली सकाळी ओकल्याची बातमी

खूप शपथा घालुनीही एक नारद जन्मला
आणि फुटली, एक खंबा संपल्याची बातमी

चेहरा सजवून गेलो, अंगभर स्प्रे मारुनी
आणि आली मास्कने तो झाकल्याची बातमी

डोलकाठी घेउनी होता निघाला तो घरी
अन् अता आली गडावर पोचल्याची बातमी

मूग गिळुनी गप्प होते सर्व सांगाती जरी
पोचली मातीत इज्जत घातल्याची बातमी

मध्यरात्रीलाच झालेली तहाची बोलणी
अन् सकाळी वाद खूपच पेटल्याची बातमी

३.

क्लासमेट हे निमित्त होते केवळ
गाठभेट हे निमित्त होते केवळ

हात तिचा हातात घ्यायचा होता
'चाॅकलेट' हे निमित्त होते केवळ

तिला, मलाही बिलगायाचे होते
क्लायमेट हे निमित्त होते केवळ

डोळ्यांमध्ये डुंबायाचे होते
थेटभेट हे निमित्त होते केवळ

मुद्दा नव्हता भांडायाला काही
नेमप्लेट हे निमित्त होते केवळ

शिवाजीनगरहून जायचे होते
स्वारगेट हे निमित्त होते केवळ

तिच्या वयाचा इश्यू नव्हता काही
बर्थडेट हे निमित्त होते केवळ

गाडी ती मुद्दाम चुकवली होती
आज लेट हे निमित्त होते केवळ

नाॅनवेज खायचेच होते मजला
पापलेट हे निमित्त होते केवळ


४.

लावालावी करण्यामध्ये नंबर आहे एक तुझा
काही केल्या वाटत नाही आज इरादा नेक तुझा

किती शिताफीने तू माझा माल पळविला धोक्याने
रुचला नाही मित्रा संधीसाधू ओव्हरटेक तुझा

फेक तुझा ई-मेल आय डी,फेक तुझा हा डीपीही
एकंदर मामलाच सारा वाटत आहे फेक तुझा

किती तगादा लावलावुनी शेवटास तू गंडविले
बँकेमध्ये वठला नाही, निव्वळ बोगस चेक तुझा

तुझेच लफडे निस्तरण्याची पाळी मजवर आलेली
वाया गेला तू  देवाला केलेला  अभिषेक तुझा

चकणाबिकणा जाऊदे ना माल कुठे आधी शोधू
बड्डेचा रे कसा कुठे तो गायब झाला केक तुझा
     
५.

छे छे, मीही इन्बाॅक्समधे नको तेवढी केली घाई
मी पण केले दादा, दादा, त्याने केले ताई ताई

सैरभैर होतात दिवाणे, हिरवा ठिपका दिसल्यावरती
लगेच विस्फारतात डोळे, दिसली रे दिसली की बाई

सुंदर सुंदर फोटोंवरती करुनी लोचट कमेंट,लाइक
रात्री अपरात्रीही करती हॅल्लो-हाई, हॅल्लो-हाई

रोजरोज झोपेचे हे खोबरे होत असताना अपुले
कशास मग घेऊन बसावे गळ या हातामध्ये भाई

'मातेसम रे तुझ्या बाळ मी अजब तुझी ही त-हा निराळी' 
लगेच ओशाळुनी म्हणे तो, 'अशीच सुंदर माझी आई'

त-हेत-हेच्या टुकार गोष्टी, फेसबुकावर शिजवुन घेऊ
कधी विरोधाभास, कधी या विसंगतीची शीक-कढाई

No comments:

Post a Comment