१.
पंख फुटले पाखराला अन उडाले पाखरू
या धुमसत्या काळजाचे घन कसे मी आवरू
मोहरू दे तन, सुखाचा वेल जाई अंबरा
तू नको आता गुलाबी पालवी ती कातरू
होत नाही स्थिर जराही धावते वाऱ्यापरी
वेस ओलांडत, मनाचे दौडते हे वासरू
कैक येती संकटेही चालता वाटा नव्या
लक्ष्य लक्षावर असू दे पण नको तू बावरू
एकदा दे साद 'त्याला' तो उभा आहे सदा
हात 'त्याचा' मस्तकावर तू नको ना घाबरू
२.
फाटलेले सांधण्याला एक टाका लाव आता
काळजाला भेदणारे ,सोस थोडे घाव आता
ऐक माझ्या प्रार्थनेला ,एकदा ये पाव आता
भरकटूनी हरवलेली, ने किनारी नाव आता
श्वास सारे संपताही बंध ना सुटती कधीही
माणसाला सोडवेना जखडलेली हाव आता
झेप घेण्या अंबरी व्याकूळ पक्षी थांबलेला
पिंजरा खोलून दे तू घे भरारी धाव आता
ही कशाची रेस आहे धावतो भरधाव इतका
शिस्त थोडी भावनांना लाव कर अटकाव आता
३.
शोकांतिका जिवाची मांडून आकळेना
का काळ क्रुद्ध झाला हे भोगणे टळेना
होते सहज सुखाचे जगणे उदास झाले
घेऊन कैक वळणे रस्ता तरी सरेना
वैराग्य आज छळते देहास का अकाली
गेल्या निघून साऱ्या इच्छा कुठे कळेना
सांगून संपलेल्या गोष्टी पसार झाल्या
पिल्लांस कालचेही काहीच आठवेना
छळवाद मांडणारे येतात रोज जथ्थे
टोचून मारणारे नातलग पाहवेना
छाटून झाड सारे उखडून ध्वस्त झाले
घरट्यातल्या पिलांचा आकांत साहवेना
मंदीर ,देव , सारे झाले दगड खरोखर
पाहून दैन्य अवघे काळीज पाझरेना
............................
विद्या देशमुख
No comments:
Post a Comment