ज्ञानेश्वर त्यांच्या पसायदानात म्हणतात 'भुता परस्परे जडो...मैत्र जीवांचे'.हे जीवांचे मैत्र जोडणं खरंतर सहज साध्य नाही.आपल्याच विश्वात गुरफटलेले,स्वकौतुकात रममाण झालेले लोक आजूबाजूला ढिगाने आहेत अगदी आणि त्यात कौतुकाचे शब्द जरी आले तरी त्यात कुठला ना कुठला स्वार्थ दडला असण्याची शक्यताच जास्त.पण अशाच गर्दीत पाठीवर एक आश्वासक हात येतो आणि तो असतो जेष्ठ गझलकार कमलाकर आबा देसले यांचा.हो...जरी आज ते आपल्यात नसले तरीही त्यांनी आधीच इथल्या अनेक कवी गझलकारांना प्रकाशाची वाट बहाल करून टाकलीय.त्यामुळे त्यांचं मनातलं अस्तित्व कायम अबाधित असणार आहे.आबांना गझलकार म्हणून मांडणं हे फारच तोकडेपणाचे ठरेल.ते गझलकार होते,कवी होते,गायक होते,एक आदर्श शिक्षक होते पण त्याहून अधिक त्यांच्यातील संतत्व, त्यांच्यातलं मैत्रेय, त्यांच्यातली वडीलकी आणि एकाच वेळी त्यांच्या सानिध्यात या सगळ्यांचं अद्भुत मिश्रण जाणवत उजळून निघणारे आपण!
'पांघरली ना माती ज्याने,उधी लागते त्याच बीजाला;
प्रेम पेरता प्रेम उगवते,प्रेमातच प्रेमाचा उद्भव...'
त्यांच्या काळाचा जरासा घास या गझलसंग्रहातील हा शेर.जो आबांच्या जगण्यातूनच आला असावा.आबांकडे जो येईल त्याच्याविषयी आबांकडे केवळ आणि केवळ स्नेहभाव असायचा. तळपत्या उन्हातून आलेल्या एखाद्या पांथस्थाला रस्त्यात एखादा डेरेदार वृक्ष गवसावा आणि त्या सावलीत त्याने कृतकृत्य होऊन पुढील मार्गक्रमण करावे तशी ही आबांची सावली.
आबांमध्ये एक उत्तम मानसोपचार तज्ज्ञ देखील दडलेला असावा.असंख्य प्रश्न मनात घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला ते मुखोद्गत असणारे तुकाराम, ज्ञानेश्वरांचे दाखले द्यायचे आणि निचरा होत जायचा प्रत्येकाच्या आत साचलेल्या प्रश्नांचा.कधी त्यांचेच एखादे गीत फोनवर आर्त आवाजात ऐकवणारे आबा आठवले की त्या सुरात इश्वराचाच सुर मिसळलेला होता असे वाटते.तो न समजू शकणारे आपणच दुर्दैवी.आबांचे हे काही शेर पहा
'कोसळू द्या वीज, गर्जू द्या ढगांना
या नभाची होत वाताहात नाही '
'पाठ फिरवी ही धरा इतकेच होते
सूर्य अस्ताला कधीही जात नाही '
'कधी लढाया ,युद्ध कधी तर ,वाटाघाटी;
काहींचे हे जीवन असते रणासारखे '
'उपटत जावे वेळोवेळी अंकुरल्यावर
दुर्गुण असती शेतामधल्या तणासारखे '
'मुक्तीच्या बघ मंदिराचा हा इथे
केवढा पाया भरावा लागतो '
'या मनाला रिक्तता येतेच ,पण-
आसवांना पूर यावा लागतो '
अध्यात्मिक वळणाचं असूनही इतकं सहज सोपं प्रासादिक गझलेत लिहिणारे आबा एकमेव असावेत.
मनसोक्त सावलीत विश्राम करणाऱ्यांना एका गोष्टीचा मात्र विसर पडतो.तो म्हणजे सावली देणारं झाड उन्हात जळत उभं असतं.प्रत्येकाची पीडा,व्यथा ऐकून घेणारे आबा स्वतःच्या आयुष्यातल्या व्यथांबद्दल मात्र कधीच बोलायचे नाहीत.पण त्यांच्या गझलेतून वेदनेचा हा सूर गवसायचा.
'महाभारताच्या युद्धाहुन खूपच मोठा;
मनातला संहार कधी का दिसतो सांगा? '
'मेघास भावनांच्या परतावता न आले
आले भरून डोळे पण गाळता न आले '
'हातात काय होते रडण्याशिवाय माझ्या
मज दोन आसवांना हुलकावता न आले '
'पापण्यांना आसवांचा भार झाला
आठवांना केवढा आधार झाला '
'मोसमी ही सांत्वनांची शुष्क भाषा
सभ्यतेचा केवढा आजार झाला '
मोसमी सांत्वनांची भाषा!कदाचित आबांना माणसांच्या प्रवृत्तीचं हे ढळढळीत वास्तव कळलं असावं का?आबा गेले आणि खूप लोकांनी त्यांच्या आठवणींवर भरभरून लिहिले आणि खूप लोक जे कधीकाळी आबांच्या आश्रयाला येऊन विसावा घ्यायचे ते अगदी एक दोन दिवसातच फेसबुकवर नॉर्मल पोस्ट टाकतानाही दिसले...जाण्याआधीच आबांना हे वास्तव कळलं होतं.पण पावसाचा धर्म.. बरसण्याचा,झाडाचा...सावली देण्याचा,फुलाचा... सुगंध देण्याचा तसाच आबा आपण आपला मैत्र धर्म प्रत्येकासाठीच निभावत आलात.कौतुकाच्या निस्सीम प्रेमाने प्रत्येकाची ओंजळ काठोकाठ भरत आलात.आज आबा आपल्यात नाहीत खरंतर ही गोष्ट अजूनही मन स्वीकारायला धजत नाही.वाटतं अचानक तुमचा फोन येईल आणि आपण बराच वेळ बोलू.दमोताई वारकरी जीवनशाळेचे प्रकाश महाराज,तुषार,ज्ञानू जेंव्हा तुमच्याविषयी पोस्ट टाकतात तेंव्हा मन भरून येते आबा....त्यांनी तुमचा आभास जिवंत ठेवला आहे.आबा तुम्ही बऱ्याचदा म्हणायचात की या मोठेपणाचे मला ओझे होते फार.मला सामान्यच राहू द्या.तुमच्या या अशा वाटण्यामुळेच तुम्ही असामान्य होतात आबा.ज्ञानेश्वरांचे पसायदान तुमच्या लेखणीतून ,वाणीतून, कृतीतून झरायचे...
'घडेल ऐसे अंगावरती घाव पडू दे
नको देवपण माणूस म्हणुनी मला घडू दे '
'निर्मितीने माझ्या द्यावे सर्वांना सुख
कौतुकाच्या वेळी अंधारात दडू दे '
'प्रेमाचा अन शांतीचा दुष्काळ सरावा
सर्वांवरती सर्वसुखाची धार झडू दे '
आबा, तुमची शिष्या होण्याचे भाग्य लाभले.हे मैत्र जीवाचे शब्दातीत आहे आणि ते राहीन सोबत कायम...
.................................
योगिता पाटील
चोपडा जि.जळगाव
No comments:
Post a Comment