दोन गझला : साईनाथ फुसे



१.

तुझा गंध हलकाच वाऱ्यात होता
तुझा वास माझ्याच हृदयात होता

इथे रात सारी दुराव्यात गेली
अरे चंद्र कोण्या महालात होता?

अशी एक बरसात होऊन गेली
तुझा हात नाजूक हातात होता

दिसेना मला कालचा पाहुणा तो
चिवचिवाट येथेच खोप्यात होता

तुझे ते मला गूढ कळले न तेव्हा
बहाणा खुळा त्या नकारात होता

तुझ्या पावलांची दिसे माळ येथे
विखुरला जरी काळ रस्त्यात होता

जरी तू मला ओळखत ना कधीही
तुझा एक अश्रू पुराव्यात होता

भिकारी पुन्हा आज दारात आला
किती एकदा हाच तोऱ्यात होता?

तुझी ती निळाई मला आवडे पण
घनांचा पसाराच दोघात होता.
                   
२.

बोचणारे एक कारण राहिले
मोजके अन शेवटी क्षण राहिले

चुंबुनी तू भाळ गेला एकदा
हो कपाळी तेच गोंदण राहिले

तू हरवला डाव होता शेवटी
का तरीही तेच मीपण राहिले?

एकमेका सावरत गेलो किती!
आज कोठे आपुलेपण राहिले?

घाव होते सोसले मी कोणते?
अन कुणाचे आजही व्रण राहिले?

कारवा होता तुझ्या मागे जरी
शेवटी आता किती जण राहिले?

वाटले मी रातभर बघ चांदणे
जे नको होते तुझे ऋण राहिले

तू कुठे अन मी कुठे नंतर पुढे
आठवांचे फक्त विरजण राहिले.
             

3 comments: