मराठी गझल: आशय संपन्नता की तंत्रशरणता?:व्यंकटेश कुलकर्णी



काही महिन्यांपूर्वी एका ऑनलाइन काव्य स्पर्धेत सहभागी झालो होतो. आयोजन केलेल्या संस्थेमध्ये बरेच ज्येष्ठ कवी होते. स्पर्धेत विविध स्पर्धकांनी वेगवेगळ्या कविता सादर केल्या. त्यात काही गझल पण सादर झाल्या. परीक्षकांनी स्पर्धेनंतर आपलं मत मांडताना सादर झालेल्या गझलांची विशेष दखल घेतली होती. गझलविधेचं वेगळेपण, गझलांबद्दलचा व्यक्त झालेला विशेष आदर पाहून मी मनोमन सुखावलो.
साहजिकच अगोदर वाचलेले जुने संदर्भ आठवले. तीस- चाळीस वर्षांपूर्वी मराठी साहित्य क्षेत्रात गझलेला मिळणारी सापत्न वागणूक, कृतकपणाचा दोष, मोठमोठ्या कवी, लेखक, समीक्षकांनी गझलविधेची केलेली उपेक्षा हे सगळं वाचलेलं, ऐकलेलं आठवलं.

फार्शी- उर्दू गझ ल साधारण सहाशे वर्षांपासून लिहिली, ऐकली जात आहे. नजाकतदार, तलम, मुलायम, शृंगारिक, तात्विक असलेली रिवायती उर्दू गझल आज विविध स्थित्यंतरं अनुभवत अगदी तरक्कीपसंदही झालेली आहे.
एकाच वजनात, एखाद्या शायराने वापरलेला रदीफ घेऊन, विविध कवाफींचे प्रयोग करून आशय खुलवत खुलवत 'वाहवा', 'मुकर्रर',  घेण्याची सकस चढाओढ उर्दू शायरांमध्ये नेहमीच पहायला मिळत आली आहे. अगदी तरही गझलांचे मुशायरेही रसिकांच्या टाळ्या घेऊन आजही गाजत असतात. उर्दू गझलेची एक उत्तम समृद्ध परंपरा मुशायऱ्यांतून पहायला मिळते.

तुलनेने मराठी गझल अगदीच नवीन. गेल्या ६०- ७० वर्षांपासून मराठी गझल, रसिकांमध्ये रुजायला सुरुवात झाली आहे. भट साहेबांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि त्यानंतरच्या इतर प्रतिभावान गझलकारांमुळे आणि मुळातच असलेल्या गझलेच्या वैशिष्ट्यपूर्ण आकृतीबंधामुळे मराठी गझलेचं गारुड मराठी जनमनावर पसरलं गेलं आणि आज मराठी साहित्यात मराठी गझलेला विशेष स्थान प्राप्त झालं आहे. 
आपणा सर्वांना माहीतच आहे की, माधव ज्यूलियन यांनी फार्शी गझलतंत्र मराठीत 'गज्जलांजलीच्या' माध्यमातून रुजवायचा प्रयत्न केला. उर्दू, फार्शीतले विविध बहर आणि मराठी छंद- वृत्त संकलित करून 'छंदोरचना' लिहिलं. त्यानंतर सुरेश भटांनी एक से बढकर एक आशयसंपन्न गझला मराठी रसिकांसमोर ठेवताना, अक्षरगणवृत्तावर भर देत, शुद्ध काफिया, अलामत यामध्ये कोणतीही तडजोड न करता, सवलत न घेता (एका दीर्घ अक्षराऐवजी दोन लघु अक्षरांचा अपवाद वगळता) तंत्रशुद्धतेवर अधिक भर दिला. यामुळे मराठीत गझल ही तंत्राच्या कठोर निकषांवरच स्वीकारली गेली. त्यामुळे उर्दू गझलेचा आकृतीबंध आपण मराठी गझलेत जसाच्या तसा आत्मसात केलाय असं म्हणायला हरकत नाही.

उर्दू ही मुळातच लवचिक, वजनी उच्चारांवर आधारलेली भाषा. पण मराठीत अशी लवचिकता तुलनेने कमी आहे. मराठी पद्यात आपण ऱ्हस्व- दीर्घ उच्चारात बदल केले की ते शब्द कानाला खटकतात. पण भाषा ही प्रवाही असते असं म्हणतात. कालानुरूप त्यात बदल होत जातात. आज मराठी भाषेत कितीतरी परभाषीय शब्द सहजपणे सामावलेले आहेत. आजच्या पिढीतील गझलकार मराठी गझलेत विविध प्रयोगही करताना दिसताहेत. आणि हेच नेमकं वादाचं कारण ठरत आहे.

आज मराठी गझल जोपासताना दोन भिन्न मतप्रवाह आढळून येतात. काही जणांना गझलतंत्रात थोडीही सूट मान्य नाही. तर काही जण आशयास महत्त्व देताना तंत्रातील सूट अपवाद म्हणून मान्य करतात.

आता मराठी गझल लेखनासंबंधी काही प्रमुख वाद -मतभिन्नता पाहू:

अ. गझलेत नेमके किती शेर असावेत?
  एकदा एका कवींच्या व्हाटसअप समुहावर गझलेतील शेरांची संख्या किती असावी यावर बरीच चर्चा रंगली. त्यात काही गझलगुरूही होते, काही जण 'गझल कार्यशाळा' चालवणारेही होते. त्यांच्या मते गझलेत किमान पाच शेर असावेत आणि त्यानंतर शेरांची संख्या ही विषमच असावी. सम शेरांची गझल लिहू नये असा त्यांनी आग्रह धरला होता. अर्थात असा नियम ठासून सांगताना मात्र कोणताही ठोस संदर्भ ते देऊ शकले नाहीत. मी जेव्हा उर्दू शायरांच्या काही सम अंकी शेरांच्या गझलांचे उदाहरण दिले तेव्हा, 'उर्दू आणि मराठी गझलांना वेगवेगळे नियम आहेत,' असा हास्यास्पद खुलासाही त्या जाणकारांनी दिला. मग मी मराठीतल्या काही प्रसिद्ध गझलकारांच्या सम शेरी गझलांचे उदाहरण दिले त्यावर मात्र त्यांच्याकडे उत्तर नव्हते. पण तरीही ते आपला मुद्दा सोडायला तयार नव्हते. 'तंत्र सांभाळता येत नसेल तर गझल लिहूच नये आणि कविता लिहाव्यात,' असाही हेका तिथे धरला जात होता.
  खरं तर गझलविधा ही वृत्त, काफिया, रदीफ, अलामत अशा तंत्रात बांधलेली आहे हे मान्यच. पण उगाचच तंत्राचा बाऊ करून नव्याने गझल लिहिणाऱ्यांचा आत्मविश्वास कमी करणारे, 'आम्ही म्हणतो तेच खरं,' असा आग्रह धरणारे, गझलेच्या प्रसारास, वृद्धीस, पुढील वाटचालीस बाधा आणत आहेत असं मला वाटतं.

उर्दू आणि मराठीत सम शेरांच्या कितीतरी गझला पहायला मिळतात. यावर काही उदाहरणे पहा ...
१. बेवफा रास्ते बदलते हैं
हमसफर साथ साथ चलते हैं ...  ही  बशीर बद्र यांची सहा शेरांची ग़ज़ल आहे (ग़ज़ल संग्रह- उजाले अपनी यादों के)
२. रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ- अहमद फ़राज़ यांची सहा शेरांची प्रसिद्ध ग़जल़ (संदर्भ - रेख़्ता)  
३. वो मेरे बालों में यूँ उँगलियाँ फिराता था
कि आसमाँ के फ़रिश्तों को प्यार आता था.. वसीम बरेलवी चार शेरांची ग़ज़ल (संदर्भ रेख़्ता)
४. किसी शक के हाथों जेसे तुझे मौत हो गई है
कोई ख़ामुशी कहे है, कोई बात हो गई है... वसीम बरेलवी चार शेरांची ग़ज़ल.

आता काही मराठीतली उदाहरणे पाहू...
गझल सम्राट सुरेश भट यांच्या काही गझला…

१. जगाची झोकुनी दुःखे जगाशी भांडतो आम्ही
स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही (एल्गार ६ शेर)
२. तू नभातले तारे माळलेस का तेव्हा
माझियाच स्वप्नांना जाळलेस का तेव्हा ( एल्गार ६ शेर)
३. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ( एल्गार ८ शेर)
४. लाजुनी झाले गुलाबी दुःख माझे देखणे
ही तुझी श्वासांत आली लाघवी आमंत्रणे! (रंग माझा वेगळा ४ शेर)
५. भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले (रंग माझा वेगळा.. ६ शेर)
इलाही जमादार - अंदाज आरशाचा वाटे खरा असावा - ८ शेर असलेली गझल.
  
खरं तर अशी कितीतरी उदाहरणे मराठी आणि उर्दू गझलांमधून सापडतील. मुद्दा हा आहे की कोणाच्यातरी सांगण्यावरून, कोणतीही शहानिशा न करता आपण तो नियम ग्राह्य धरतो आणि नंतर तो नियम रूढ होत जातो. यात सांगणारेही आणि आंधळा विश्वास ठेवणारेही तितकेच जबाबदार आहेत.

ब. दुसरा विवाद: काफिया, रदीफ पुनरावृत्ती किंवा एकाच वजनात सारखेच काफिया / रदीफ घेऊन गझल लिहिणे:
  एकाच गझलेत काफिया पुनरावृत्ती किंवा एकाच वजनात इतरांनी वापरलेले काफिया, रदीफ  घेऊन गझल लिहिण्याचा प्रघात उर्दू शायरांमध्ये सर्रास आढळतो. त्या शायरांना एकमेकांच्या गझलांबद्दल आदरच असतो. पण मराठीत असं काही झालं की त्यावर गंभीर चर्चा होतात. बऱ्याच वेळा वाद होतात, आक्षेपही घेतला जातो.

उर्दू ग़ज़लांची काही उदाहरणे पहा:

१. सूरज चंदा जैसी जोडी हम दोनों
दिन का राजा, रात की रानी हम दोनों
- बशीर बद्र
२. दर्द पुराना, याद सुहानी हम दोनों
इश्क का किस्सा, प्रेमकहानी हम दोनों                    
- इर्शाद वसीम
३. आवारा आवारा ख़ुशबू हम दोनो
जाने किस दिन होंगे यकसू हम दोनों
-माहिर अब्दुल हई
४. आपकी याद आती रही रात भर
चश्म-ए-नम मुस्कुराती रही रात भर
- मखदूम मोहिउद्दीन (चित्रपट- गमन)
५. आप की याद आती रही रात भर
चाँदनी दिल दुखाती रही रात भर
- फ़ैज अहमद फ़ैज

क). गझल अक्षरगणवृत्तातच असावी?:
गझलेत आशय महत्त्वाचा, लय महत्वाची. ऐकणारा नेहमी शब्दांवर, आशयावर प्रेम करतो. त्याला वृत्त, छंदाचं काहीही देणंघेणं नसतं. अक्षरगणवृत्तात लिहिण्याचा प्रघात उर्दूत आढळतो. पण तिथे एका गुरूसाठी दोन लघु अक्षरं घेणे, उच्चारी वजनानुसार मात्रा कमी मोजणे (मात्रा गिराना) अशी सूट सर्रासपणे घेतली जाते. मराठीत मात्रावृत्तात लिहिलेल्या गझलाही अतिशय लोकप्रिय झालेल्या आहेत. मात्रावृत्तात अधिक शब्दपर्याय मिळतात आणि आशय उत्तमरीत्या खुलवता येतो. अर्थात मात्रावृत्तात लिहिताना लय, यती सांभाळायलाच हवी, अन्यथा गझल वाचताना, ऐकताना लय जाते, कानाला खटकते.
प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांच्या कितीतरी गझला या मात्रावृत्तातील आहेत आणि त्या अतिशय प्रसिद्ध आहेत.
उदाहरणार्थ:
१. घर वाळूचे बांधायाचे
स्वप्न नव्हे हे दीवाण्याचे
२. करू नये ते करतो आहे
स्वप्नांवरती मरतो आहे
३. आकाशाला भास म्हणालो चुकले का हो
धरतीला इतिहास म्हणालो चुकले का हो

ड). शुद्ध काफिया की स्वर काफिया?
   भट साहेबांनी मराठी गझलेत शुद्ध काफिया वापरण्यावर भर दिला होता. पण आज बरेच गझलकार शुद्ध काफिया बरोबरच स्वर काफियांचाही आपल्या गझलांमधून उत्तम वापर करताना दिसताहेत. उर्दूत स्वर काफिया सर्रास वापरला जातो. मुळातंच उर्दू आणि मराठी भाषालिपींमध्ये काही मूलभूत फरक आहेत. उर्दू भाषालिपींमध्ये स्वरचिन्हे ही स्वतंत्र अक्षरं आहेत, पण मराठीतील स्वरचिन्हे (काना, मात्रा, उकार, वेलांटी) मात्र शब्दांसोबत जोडून येतात.

निष्कर्ष:
गझल लिहिताना आशयास अधिक महत्त्व द्यायचं आणि गझलेचा आशय जिवंत करायचा की, तंत्राच्या अट्टाहासासाठी, तंत्रास शरण जाऊन आशयाशी तडजोड करत गझलांचे निर्जीव सांगाडे रचायचे हा खरं तर ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न.
असं म्हणतात की प्रत्येकजण आपल्या प्रकृतीनुसार आणि प्रवृत्तीनुसार लिहितो, व्यक्त होतो. उर्दू गझलेच्या तुलनेत मराठी गझल अजून तरुण आहे. नवीन पिढीला गझलतंत्राच्या अनाठायी बंधनांची भीती न दाखवता त्यांना गझल लिखाणास, नवनवीन प्रयोगास त्यांच्या सृजनशीलतेस वाव देणं, प्रोत्साहन देणं ही प्रत्येक गझलकाराची नैतिक जबाबदारी आहे. 
.................................
व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद
मोबाईल: 9500484442
ईमेल: kulkarnivenkatesh513@gmail.com

8 comments:

  1. विषयाला धरुन खूप अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. उर्दू आणि मराठी सम शेरांच्या गझलांचे संदर्भ खूपच समर्पक. अभिनंदन.

    ReplyDelete
  2. फार सुंदर, येवढ गझल विषयी वाचलच नव्हत कधी

    ReplyDelete
  3. सुरेख मार्गदर्शक लेख.!🌹💐

    ReplyDelete
  4. अनेक उदाहरणांमुळे सुस्पष्ट झाला आहे लेख

    ReplyDelete
  5. तुमची गझल श्रवणीय आणि आशय पूर्ण असते आपला लेख माहितीपूर्ण आहे शुभेच्छा

    ReplyDelete
  6. छान अभ्यासपूर्ण लेख. गुजराती गझलेची जवळपास दिडशे वर्षांची परंपरा आहे. गुजराती गझल मी जवळून पाहिली आहे त्या आधारे मी तुमच्याशी बहुतांशी सहमत आहे.

    अ. गझलमधे शेरांच्या संख्येचा वाद तर माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. सम काय आणि विषम काय? काय फरक पडतो? गुजरातीत अगदी ४ शेरांच्या गझला ही स्वीकार्य आहेत. ६० -७० वर्षांपूर्वीचे गझलकार १५ -२० शेरांच्या गझला लिहायचे पण आताचे गझलकार ५ -७ शेरांच्या गझला लिहितात. प्रत्येक शेर ही सुटी कविता आहे म्हटल्यावर सम-विषम का करायचे याचा तर्क काही समजत नाही.

    ब. गझलेच्या जमीनीचे ७/१२ ची नोंदणी अजून तर काही होत नाही. ती सुरू होई पर्यंत कोणी ही कुठली ही जमीन घेतली तर त्यावर कोणी मालिकी हक्क गाजवू शकत नाही. ज्याचे शेर चांगले/गझल चांगली ती आठवणीत राहील. झाले!

    क. मात्रा गिराना सारखी भाषिक लवचिकता न स्वीकाराल्याने वृत्त लवचिक करावे लागत आहे - अक्षरगणवृत्तां ऐवजी मात्रावृत्त. पण त्यात ठरावीक लगावलीने येणारे नादमाधुर्य हरवते, जे मराठीतर गझलपरंपरांनी प्राणपणाने जपले आहे. तर त्या परंपरेंकडून शिकायचे की नाही हे मराठी गझलकारांनी ठरवायचे आहे.

    ReplyDelete
  7. लेख नक्कीच तर्कनिष्ठ आहे. नाहीतर नवकवितेचे प्रणेते केशवसुतांनी "अशी असावी कविता फिरून..." असे शतकापूर्वीच म्हटले आहे.

    ReplyDelete