आमची गझलसाद : अशोक म. वाडकर



गझलसम्राट सुरेश भटांच्या दमदार प्रयत्नामुळे मराठी साहित्य विश्वात गझल विधेची जोरकस वाटचाल सुरू झाली. अनेक प्रथितयश व नवोदित कवी गझलेच्या संवादात्मक गुणवैशिष्ट्यांनी प्रेरित होऊन गझल लेखनाकडे वळत आहेत, हे विविध प्रसिद्धी माध्यमांवरून स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोप-यांतून गझलसंग्रह प्रसिद्ध होण्यात लक्षणीय वाढ होते आहे. अशा पार्श्वभूमीवर कोल्हापूरस्थित 'गझलसाद' या समूहाने समूहाच्या पाचव्या वर्धापन दिन व गझलसम्राट सुरेश भटांच्या नव्वदाव्या जयंतीदिनाचे औचित्य साधून प्रकाशित केलेला 'आमची गझलसाद ' हा प्रातिनिधिक गझलसंग्रह लक्षवेधी ठरेल यात शंका नाही. संग्रहात इंग्रजी वर्णमालेनुसार डॉ.दयानंद काळे, डॉ.दिलीप पां.कुलकर्णी, प्रा. नरहर रामचंद्र कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, श्रीराम ग. पचिंद्रे, प्रविण पुजारी, अरुण सुनगार व अशोक म. वाडकर या आठ गझलकार व सौ.मनिषा रायजादे-पाटील, सारिका पाटील, डॉ.सुनंदा शेळके व डॉ.सौ.संजीवनी तोफखाने या चार गझलकारा यांच्या प्रत्येकी अकरा गझला परिचयासह समाविष्ट केल्या आहेत. हे सर्वच उत्तम गझलकार / गझलकारा विविध व्यवसायातील व कमीजास्त वयोगटातील स्त्री-पुरूष असून त्यांची आर्थिक, सामाजिक, भावनिक परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे संग्रहाचे पान-न्-पान वैविध्यपूर्ण गझलांनी समृद्ध व वाचनीय असे झाले आहे. साहजिकच गझलकारांच्या अनुभूती, प्रवृत्ती-अभिव्यक्तीची ढोबळमानाने वाचकांस ओळख  होऊ शकते. हे संग्रहाचे वेगळेपण मराठी गझलेच्या इतिहासात निश्चितच अधोरेखित होईल. सर्वसाधारणत: अन्य प्रातिनिधिक गझलसंग्रहात अधिकतर दोन-तीन गझलांचाच समावेश केलेला आढळतो.

सदर गझलसंग्रहास गझलसम्राट भटसाहेबांच्या प्रत्यक्ष दीर्घ परिपूर्ण मार्गदर्शनाचा लाभ होऊन त्यांचेकडूनच ज्यांना 'गझलनंदा ' असे  नामाभिधान प्राप्त झाले आहे अशा गेली ४०-४२ वर्षे गझललेखन व मार्गदर्शन करणाऱ्या नामवंत गझलकारा दस्तुरखुद्द सौ.सुनंदा पाटील यांची अभ्यासपूर्ण व निरीक्षणात्मक तपशीलवार प्रस्तावना लाभली आहे. बाराही गझलकारांसंबंधी त्यांनी आपली अभ्यासपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. शिवाय स्वत:ला भावलेले काही शेरही प्रस्तावनेत आवर्जून उद्धृत केले आहेत.

निखील कुलकर्णी यांनी चितारलेले गझलसंग्रहाचे मुखपृष्ठ व मांडणी कलात्मक असलेने तसेच पुस्तकाची निर्मितीही कसदार असल्याने प्रस्तुत गझल संग्रह अत्यंत देखणा व संग्राह्य झाला आहे.

विस्तृत प्रस्तावनेच्या शेवटी गझलनंदा म्हणतात- 
'सुरेश भटांच्या गझलेमधील सामर्थ्यस्थळे स्वीकारून, पचवून, ग्रहण करून त्यात आपली वेगळी भर टाकणारे गझलकार १९८० ते २०००च्या आसपास समोर आले. त्याच लोकांनी पुढल्यांना मार्गदर्शन केलेले असल्याने सुरेश भट यांचा वारसा सांगणारे हे सर्व गझलकार आहेत, यात शंका नाही. या सर्वांची गझल कमी अधिक प्रमाणात वर्तमानकालीन, सामाजिक, राजकीय वास्तवाचा वेध घेते आणि त्या वास्तवाची अभिव्यक्ती अस्सल मराठमोळ्या स्वरुपात करते. '
'आमची गझलसाद' हा प्रातिनिधिक गझलसंग्रह मराठी गझलेच्या वाटेवरचा मैलाचा दगड ठरेल.     
................................
प्रातिनिधिक गझलसंग्रह : आमची गझलसाद
प्रकाशक : गझलसाद, कोल्हापूर
पृष्ठे : १६४
मूल्य : २०० रुपये                      संपर्क : ७०२०० ११४०८

No comments:

Post a Comment