१.
कातरवेळी होतो कातर
जिवंत आहे त्यातिल शायर
आधी म्हटला प्रेम वगैरे
जात आणली नंतर नंतर
सुरुवातीला काही नव्हते
नंतर आले...आले जर-तर
जवळीकतेचि ही पण व्याख्या
लपून असते तिथेच अंतर
उजाड आहे माळ अता हा
गाव इथेही होते सुंदर
ऊब हवी होती दोघांना
आच लागली कसली नंतर?
जीव अता हा घेउन घे तू
निदान हे उपकार तरी कर
भांडणही खच्चून करावे
प्रेम सुद्धा नको ना वरवर
जखमांची तर सवयच आहे
पाहते अता जाशिल कुठवर!
२.
मनाचीच होते जखम जर मनाला
कशाला उगा जीव द्यावा जिवाला
कुण्या गावचा कोण जाणे प्रवासी
जरा धीर नसतो कुठेही सुखाला
तुझे लाड करतात सगळेच दुःखा
मिठी का तुझी मग नकोशी कुणाला?
किती वेळ झालाय मिटले न डोळे
असावे असे काय त्याच्या छताला!
स्वतःचाच हो यार आता गड्या तू
कुणाची गरज मग पडेलच कशाला
करू फक्त इतके सुखी व्हायचे जर
स्वतःची तरी चूक सांगू स्वतःला
जसे वाटते ना..तसे बस जगावे
फरक काय पडतो तसाही जगाला
खरा वाटला जो हिरा कोंदणाचा
निखळताच तो कोळशाचा निघाला
तिने पावसाला जवळ घेतले अन्
किती वेदना जाहल्या बघ उन्हाला
ऋतू कोणताही असो बहरण्याचा
फुलूद्यात ना बारमाही फुलाला
३.
आहे मी ही तुझ्यासारखा
दरवळणाऱ्या उन्हासारखा
नव्हते हे जग माझ्यासाठी
मी ही नव्हतो जगासारखा
पडशिल तू ही प्रेमामध्ये
दिसलो मी जर कुणासारखा
तलफ तुलाही लागत जाते
असो...असू दे चहासारखा
बरेच काही खरे बोललो
तुला वाटलो पिल्यासारखा
डोळ्यांचीही ओंजळ होते
तुझा चेहरा फुलासारखा
जुनीच वळणे घेतो आपण
भास उगाचच नव्यासारखा
दिवस कोणता स्मरे न काही
मला वाटला सणासारखा
या हातांना नशीब नव्हते
तुला मिळू दे मनासारखा
No comments:
Post a Comment