नदीला गाज नाही : चंद्रकांत धस




माझा गझललेखन-वाचन विशेष आवडीचा विषय असल्यामुळे मी विद्यावाचस्पतीच्या पदवीसाठी मराठी गझलेचाच अभ्यास करायचे ठरवले आणि “स्त्रियांचे गझललेखन” हा विषय निवडला. त्यानिमित्ताने अनेक स्त्रियांचे गझलसंग्रह वाचण्यात आले. परंतु विशेष लक्ष वेधून घेतले ते म्हणजे २३ जुलै २०२१ रोजी स्वयं प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या अल्पना देशमुख-नायक यांच्या 'नदीला गाज नाही 'या गझलसंग्रहाने. तोच गझलसंग्रह मी आज पुस्तक परीक्षणासाठी निवडलेला आहे.
ज्यांनी मराठीत यशस्वीपणे गझल आणली, रुजवली, वाढवली त्या स्व. सुरेश भटांची जन्मभूमी असलेल्या विदर्भाच्या मातीला एक ईश्वरी वरदानच आहे असे मला नेहमी वाटत आले आहे. त्या मातीने गझलेतील अनेक गझलकार हिरे जन्माला घातले. त्याच परंपरेतील अलीकडच्या काळातील एक आश्वासक नाव म्हणजे अल्पना देशमुख-नायक होय. त्यांच्याच 'नदीला गाज नाही 'या गझलसंग्रहावर इथे मी भाष्य करणार आहे.
प्रस्तुत गझलसंग्रहामध्ये एकूण ८० गझलांचा समावेश आहे. एकदा वाचायला घेतलेला संग्रह खाली ठेवावासा वाटत नाही. लेखकाच्या लेखनातील असलेला प्रवाहीपणा गझलसंग्रह वाचत असताना वाचकांच्या वाचनातही आपोआप येतो व नकळत वाचक हा लेखकाच्या साहित्यकृतीशी समरस होऊन जातो हा अनुभव मलाही येऊन गेला.
गझलसंग्रहाची प्रस्तावना: 
कोणत्याही पुस्तकाची प्रस्तावना हा त्या पुस्तकाच्या अंतरंगाचा आरसा असतो. गझल संग्रहाच्या सुरुवातीलाच प्रसिद्ध गझलकार रुपेश देशमुख यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना वाचत असतानाच गझलसंग्रहाचे अंतरंग उलगडू लागतात. सहसा एक कवी दुसर्‍या कवी बद्दल चांगले उद्गार काढेलच असे सांगता येत नाही. परंतु रुपेश देशमुख यांनी अगदी मनापासून प्रस्तुत गझलकाराच्या आवडलेल्या शेरांचा उल्लेख करून वाड्.मयीन मूल्यमापन केले आहे. प्रस्तावनेत साहित्याविषयी व साहित्यिकांविषयी फक्त स्तुतीसुमनेच उधळण्याचा प्रघात बहुधा हल्ली दिसून येतो. परंतु रुपेश यांनी त्रयस्थ व तटस्थ नजरेने गझलरचनेमध्ये किंचित असलेल्या उणिवाही तितक्याच आत्मीयतेने हेरलेल्या आहेत. 
गझलकाराचे मनोगत:
'हे माझ्या जगण्याचे गाणे 
उगाच वर वर नाही बोलत '
'अबोल' अशा अल्पनाजींचा हा 'बोलका' शेर त्यांचे मनोगत समजण्यास किती पुरेसा आहे ते कळते. कारण मनोगतात जे त्यांनी व्यक्त केलंय ते वरवरचे नसून अगदी अंतःकरणापासून व्यक्त केलेले आहे. कोणताही अभिनिवेश त्यात दिसत नाही. आजकालच्या काळात इतरांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटताना अनेक लोक दिसतात. इथे मात्र गझलकार स्वतः अपार मेहनत घेऊनही आपल्या गझलसंग्रह निर्माणाचे सर्व श्रेय इतरांना देतात. गझलेची भेट झाली हेच त्या विधिलिखित मानतात. तिलाच सखी मानून आपले सुख-दुःख, एकटेपणा, मनातील भावभावनांचा कल्लोळ तिच्याजवळच वेळोवेळी व्यक्त केल्याची कबुली त्या देतात.
प्रत्येक कवीच्या मागे काव्यलेखनाची एक प्रेरणा असते. अल्पनाजींच्या काव्यलेखनामागे त्यांच्या मातोश्रींची प्रेरणा आहे हे शेरातून त्या कशा व्यक्त करतात पहा -
'एकही अक्षर स्वतःचे यात लिहिलेले कुठे?
फक्त तू हाती दिलेला वारसा सांभाळते '
यापेक्षा प्रांजळ मनोगत काय असू शकते? '

गझल संग्रहाची भाषाशैली नदीच्या पाण्याप्रमाणे संथ व प्रवाही अशी आहे. आशय अभिव्यक्तीच्या आवश्यकतेनुसार संमिश्र अशा स्वरूपाची भाषा दिसून येते. बहुतांश ठिकाणी प्रमाण भाषा वापरली असली तरी काही ठिकाणी गरजेनुसार ग्रामीण भाषेतील किंवा बोली भाषेत रुळलेले इतर भाषेतील 'कॉकटेल', 'टेन्शन', 'फुरसत', ‘जिंदगी’ सारखे शब्द, वेगळे न वाटता आशयाशी सुसंगत असेच वाटतात. अतिशय साधी, सोपी, सहज समजणारी अशी भाषाशैली हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या गझललेखनात प्रायोगशीलताही जोपासल्याचे दिसून येते. 

प्रस्तुत गझलसंग्रहामध्ये गझलकाराने वाड्.मयीन मुल्ये जोपासलेली दिसून येतात. काव्य या वाड्.मय प्रकारामध्ये गझल हा एक छंदबद्ध व तंत्रानुगामी काव्यप्रकार आहे. त्याचे आपले स्वतंत्र वृत्त, व्याकरण, तंत्र व नियम आहेत. विशिष्ट आकृतीबंध आहेत. प्रस्तुत गझलसंग्रहामध्ये गझलकाराने अशा सर्व बाबींचे काटेकोर पालन केल्याचे दिसून येते. गझल या विधेला 'कवितांची कविता ' असे संबोधले जाते. कारण प्रत्येक द्विपदी ही स्वतंत्र कविताच असते व अशा एकच जमीन, काफिया व रदीफ असलेल्या किमान पाच द्विपदी मिळून एक गझल होते. असे म्हटले जाते की गझलेत एकवेळ 'वृत्त' नसले तरी चालेल पण 'वृत्ती' असणे आवश्यक आहे. अल्पनाजींची वृत्तीच गझलमय झाल्याने गझललेखनाची विविध वृत्ते त्यांनी लीलया हाताळलेली आहेत. प्रस्तुत गझलसंग्रहांमध्ये शुद्ध लेखन नियमांचे काटेकोर पालन केलेले दिसून येते. प्रतिमा-प्रतीकांचा पुरेपूर वापर अनेक व्दिपदींमध्ये झालेला दिसून येतो. कुठेही एकसुरीपणा जाणवत नाही. या साहित्य कृतीची स्थळचित्रणे, व्यक्तीचित्रणे, मानवी स्वभावाचे अनेक कंगोरे, पुरुषप्रधान संस्कृतीचे दर्शन, स्त्रीवाद, अशी अनेक वैशिष्टये सांगता येतील. त्यांच्या गझलेतून समाजातील समस्यांचे चित्रण, शेतकऱ्यांच्या समस्या, नात्यांची घालमेल, स्त्रीसुलभ भावनांची उकल, वैश्विक विचार, इत्यादी बाबी चित्रित होतानाच भावनांचे सार्वत्रिकरण झालेले दिसून येतात.
प्रसिद्ध लेखक शिव खेरा म्हणतात, 'यशस्वी माणसं वेगळं काही करीत नाहीत, फक्त ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात ' नेमकी हीच प्रचिती अल्पनाजींच्या बाबतीत अनुभवाला येते. 'नदीला गाज नाही ' ह्या गझल संग्रहातील गझलांचे विषय फारसे नवीन नाहीत. परंतु तरीही त्यात वेगळेपणा, नावीन्य पदोपदी दिसून येते. एका व्दिपदी मध्ये त्या मोठ्या आत्मविश्वासाने म्हणतात -

    'नवे काहीतरी मिळणार नक्की     
    पहा तू कोणतेही पान माझे '

हा आत्मविश्वास त्यांच्या एकूणच गझल लेखनामध्ये जागोजागी दिसून येतो. त्यांच्या लिखाणाचा साधेपणा हेच त्यांचे बलस्थान आहे व संवादी भाषा हे वैशिष्ट्य आहे. स्त्रीची सोशिकता, व्यथा-वेदना ह्या काही द्विपदी मधून दिसून येतात -
  'काळजातच वेदनांची मांडली आरास मी
  दावली नाही स्वतःची आसवे कोणास मी '
किंवा

'गोष्ट मनातच ठेवत गेले 
    तिची बातमी नाही केली '

किंवा

'ती करत नाही प्रदर्शन ताकदीचे 
याच साठी तर नदीला गाज नाही '

किंवा

'दिला फाटा मनाच्या सुप्त इच्छांना
जवळ केले घराच्या मूळ प्रश्नांना '

'करू का बंद डोळे, कानही माझे ?
कुलूप लावले आहेच ओठांना '

एकूणच जीवनाचे तत्त्वज्ञान त्यांच्या अनेक द्विपदीतून दिसून येते. वानगीदाखल ही द्विपदी -

'सलत रहावी अपूर्णता आयुष्याला
पूर्णत्वाचा ध्यास खुळासा राहू दे '

अपूर्णतेची सल असल्याशिवाय पूर्णत्वाचा ध्यास लागत नाही. जीवनात सुख आणि दुःख हे दोन्ही असणारच. हे जर तितकेच सत्य असेल तर मग त्यांना सोबत घेऊनच चालले पाहिजे. हा शेर बघा -

'कॉकटेलच छानसे बनवायचे
आसवांमध्ये हसू मिसळायचे '

'कॉकटेल ' हा इंग्रजी शब्द नशा अधिक येण्यासाठी केलेल्या मद्यांच्या मिश्रणासाठी वापरला जातो तो इथे चपखलपणे वापरला आहे. हसू आणि आसू परस्पर विरोधी गोष्टी असूनही जीवनाचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी त्या एकत्र आणण्याचा किती सोपा उपाय त्या सहज सुचवून जातात.      
      'पिकलिया शेंदे। कडुपण गेले। 
      तैसे आम्हा केले। पांडुरंगे।। '
ह्या संत तुकारामांच्या अभंगाची प्रचिती देणारा व एखाद्या षड्विकारयुक्त व्यक्तितील आयुष्याच्या संध्याकाळी वृत्तीत झालेला चांगला बदल दर्शविणारा हा शेर पहा - 

  'उन्हाच्या पायऱ्या खाली उतरताना    
  किती निष्पाप दिसतोस सूर्य ढळताना '

त्यातून जीवनाचे तत्त्वज्ञान त्या किती सहज सांगून जातात. हे सर्व त्यांना कसे जमते? हा आत्मविश्वास कुठून येतो? त्यालाही त्या उत्तर देतात -

  'आयुष्यावर बोलू शकते आहे कारण 
  मी नेमाने वाचत असते आयुष्याला '

अल्पनाजींच्या गझलेला सामाजिक भान आहे. स्त्रीवादाची जाणीव आहे. त्यांच्या गझलांच्या आशयाचा दर्जा व खोली दोन्हीही असामान्य आहे. त्यांची गझल वाचकाला सामाजिक समस्यांवर अंतर्मुख करणारी आहे. शेतकऱ्याच्या समस्यांवर भाष्य करताना त्या म्हणतात -

  'दागिने मोडून आधी पेरणी केली खरी
  कापणी साठीच मागे ठेवलेले डोरले '

शेतकऱ्यांना पिवळ्या सोन्यापेक्षा काळे सोने किती महत्त्वाचे आहे हे यातून दिसते.
जीवनात तडजोडीचे धोरण स्वीकारणे अपरिहार्य असते हे पुढील शेरातून अतिशय समर्पक शब्दात त्यांनी सांगितले आहे…
      "बळेच तो समजावत होता 
      मीही दाखवले पटल्यागत"
किंवा "घाव होते दिले खूप तू 
    काळजाने जपावे असे"
किंवा "सुगंध देण्यासाठी त्याला 
    तिने स्वतःची जाई केली"
पती-पत्नीच्या नात्यातील भावनांची गुंतागुंत व पत्नीचे त्याच्या प्रती समर्पण सांगतानाच त्या भूकबळी गेलेल्या पोटच्या गोळ्यांची बापाला भाकरीचा घास घेताना झालेली घालमेल व हळवी आठवण सांगतात-

  'त्या क्षणी डोळ्यापुढे दोन्ही मुले आली
  ज्या क्षणी हातात त्याच्या भाकरी आली '

नात्यांची काळी बाजूही दुसरीकडे त्या दर्शवतात -

'भरोसा ठेवला अन् घेतला आधार खांद्याचा
तिथेही कापले गेले गळे लक्षात आले का? '

पुरुषप्रधान संस्कृतीला आव्हान देणारा हा स्त्रीवादी शेर पहा -

'रोखता येणार नाही झेप स्वप्नांची तुला 
या नभाचे दोन तुकडे बांधले पंखास मी '

बदलत्या काळात बालपण हरवल्याची खंत सांगणारा हा शेर पहा -

    'चुरमुरे अन रेवड्यासाठी रुसावे
    लेकरू आता तसे निर्व्याज नाही '

अशा प्रकारे अल्पना देशमुख-नायक यांच्या गझल रचनांना पुरेपूर वाड्.मयीन मूल्य आहे हे दिसून येते. 

गझलकार गेले सात वर्ष गझल लेखन करत आहेत. “नदीला गाज नाही” हा त्यांचा पहिलाच गझल संग्रह. नवोदित असूनही गझल संग्रह वाचताना कुठेही तसे जाणवत नाही. त्यांची  आशय,अभिव्यक्ती अतिशय प्रगल्भ असल्याचे वरील निवडक व्दिपदींच्या माध्यमातून दिसते. याचे श्रेय त्यांच्या मातोश्री कडून बालपणापासूनच मिळालेल्या साहित्य संस्काराला व काकांनी रुजवलेल्या रसिकतेला जाते. एकंदरीत 'नदीला गाज नाही ' या संग्रहातील गझलांवर दृष्टिक्षेप टाकताना असे जाणवले की गझलकाराला अतिशय उज्ज्वल असा भविष्यकाळ आहे. गझलकार स्वतःही आत्मविश्‍वासाने व ठामपणे सांगतात -

'कवितेस कधीही माझ्या वार्धक्य यायचे नाही 
ती काळाच्या ऐन्याचा उडणारा पारा नाही '

गझलकार अल्पना देशमुख-नायक यांची गझल अशीच बहरत राहो या शुभेच्छांसह हा गझलसंग्रह गझलविश्वामध्ये निश्चितपणे मानाचे स्थान मिळवील अशी आशा व्यक्त करतो.
................................. 
गझलसंग्रह : नदीला गाज नाही : सौ.अल्पना देशमुख-नायक
प्रकाशन : स्वयं प्रकाशन, सासवड, पुणे.
प्रथम आवृत्ती : २३ जुलै २०२१, 
किंमत: १५०/- रुपये, पृष्ठ संख्या: ९६

No comments:

Post a Comment