संत वाड्मय परंपरेच्या सुधारणावादी विचारांना पेरणारा गझल संग्रह : 'तुकोबाच्या कुळाचा वंश'
.
प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारून संत वाड्मय परंपरेच्या सुधारणावादी विचारांना मनामनात पेरणारा गझल संग्रह 'तुकोबाच्या कुळाचा वंश!' हा गझल संग्रह वाचतांना अनेक विचारांचे वादळ वाचकांच्या डोक्यात घोंगावत राहते. नेहमीच्या विचारांना फाटा देऊन प्रत्येक गोष्टीचा जरा वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवा हे सतत जाणवू लागते. 'तुकोबाच्या कुळाचा वंश' हा गझल संग्रह समाजभान जागृत करून सकारात्मक विचारधारेस प्रवाही करणारा आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील गझलकार संतोष विठ्ठलराव कांबळे यांची गझल संत परंपरेच्या लोक शिकवण आणि बोधप्रद विचारधारेच्या अनुषंगाने तुकोबाच्या कुळाशी आपले नाते सांगते. यापूर्वी २०१४ मध्ये त्यांचा 'तिची तीन रूपे' हा स्त्रीवादी विचारसरणीचा काव्यसंग्रह येऊन गेला आहे. 'तिची तीन रूपे' या काव्यासंग्रहास रसिक वाचकांनी जोरदार प्रतिसाद दिलेला आहे.
संतोष कांबळे यांच्या 'तुकोबाच्या कुळाचा वंश' या गझलसंग्रहाला आजवर साहित्य विहार संस्था, नागपूरचा सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कार, खेड भावळणी, जि. सोलापूर ज्ञानवर्धिनी सार्वजनिक वाचनालय
तसेच शेवळे येथील बळीराजा प्रतिष्ठानचा स्व. कुबेर पवार स्मृती पुरस्कार, ज्ञानवर्धिनी सार्वजनिक वाचनालय, शिवाबाबा प्रतिष्ठानचा शहादू वाघ स्मृती पुरस्कार, अक्षरोदय साहित्य मंडळ, नांदेड यांचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार, मसाप राजगुरूनगर यांचा 'पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार', सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर, जि. सांगली यांचा दिवंगत कवी सुरेश कुलकर्णी स्मृती उत्कृष्ट काव्यनिर्मिती पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाड्मय पुरस्कार, महात्मा फुले उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार चंद्रपूर, इत्यादी ख्यातनाम पुरस्कार प्राप्त आहेत.
स्वतःला तुकोबांच्या विचारांचे वंशज मानणारे संतोष कांबळे यांचा 'तुकोबाच्या कुळाचा वंश' हा गझल संग्रह ऋषी प्रकाशन पुणे तर्फे प्रकाशित झाला आहे. या संग्रहास चित्रकार अरविंद शेलार यांनी अत्यंत बोलके, साजेसे व सुरेख मुखपृष्ठ दिले आहे. सुप्रसिद्ध जेष्ठ गझल समीक्षक डॉ. राम पंडित (पद्मानन्दन) यांची देखणी व सखोल अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभल्याने गझल संग्रहाचे वजन वाढले आहे. विझलेल्या निखाऱ्यातूनही पुन्हा नव्या विचारांचा वणवा पेटवण्याचे सामर्थ्य त्यांच्या गझलेत आहे. या वक्त्याव्याची पुष्टी देणारा शेर-
'घातली फुंकर जराशी तर बनू शकतो निखारा
कोळशाच्या आत शिल्लक विस्तावाचा त्राण आहे '
वरील शेराप्रमाणे त्यांच्या आतील निखारा त्यांना कधीही स्वस्थ बसू देत नाही. तो सतत नवनवीन विचारांची ठिणगी त्यांच्या डोक्यात टाकत असतो. गझल सम्राट सुरेश भट यांनी सुरू केलेल्या गझल परंपरेला नव्या विचारांची दिशा देऊन संतोष कांबळे यांनी समृद्ध केले आहे. 'तुकोबाच्या कुळाचा वंश' हा संतोष कांबळे यांचा पहिलाच गझल संग्रह त्यांच्या प्रगल्भ विचारांचे देणे आणि अनन्य साधारण कल्पना शक्तीचा, सर्जनशील काव्य शक्तीचा परिचय वाचकांना करून देतो. त्यामुळेच त्यांनी तुकोबारायांची तळपती लेखणी हस्तगत केली.
'त्या तुकोबाच्या कुळाचा वंश माझा,
शब्दरत्नांची मला जागीर आहे '
समाजातील अनिष्ट रूढी, परंपरेच्या नावाखाली सामान्य माणसांची होणारी पिळवणूक, अंधश्रद्धा, राजकारणातील स्वार्थी पापभिरू नेत्यांवर त्यांनी घणाघाती प्रहार केलेला आहे. जातीयवाद, त्यांनी केवळ मनातील विद्रोही प्रवृत्ती मांडली नाही तर आवेशपूर्ण साद घालून निद्रिस्त समाजमनास जागृत करून अज्ञानावर ज्ञानाने मात करण्याचे आव्हान केले आहे. त्यांनी आपल्या गझलेतून संप्रेक्षणीय प्रतिकात्मक शैली वापरलेली आहे. त्यासासाठी 'तुकोबाच्या कुळातील वंश' मधील काही निवडक शेर नमूद केले आहेत
'अंधश्रद्धेची दुकाने चालवाया,
भक्त इथले नेहमी भयग्रस्त ठेवा '
'मुखवटे ढोंगी अमर होतील तुमचे
लेखणी तुमच्याकडे अधिनस्त ठेवा '
'युद्ध म्हणजे काय, हे वाचाळ नेत्यांना कळू द्या,
युद्ध कुठल्या रेशमी उद्घाटनाची फीत नाही '
'यामुळे का विठ्ठला खाली नजर झुकली असावी
प्रश्न पहिल्या पायरीचे थेट गाभाऱ्यात गेले '
'ही पिके होतीलही भगवी, निळी, हिरवी
येतसे घामास हल्ली वास धर्माचा '
'संवाद ईश्वराशी चाले मठात या
स्वर्गातही मिळाले कव्हरेज वाटते '
'या उजळ वस्तीतला इतिहास काळाकुट्ट आहे;
नांदती इमले सुखाने झोपड्या हटवून कायम '
'अज्ञान, अंधश्रद्धा व्यापून राहिल्याने,
साध्याच माणसांचे अवतार होत गेले '
समाजातील हरवत चाललेली माणुसकी आणि लोप पावत चाललेली संवेदनशीलता देखील त्यांनी अधोरेखित केली आहे. जिवंतपणी घरातील वृद्ध माणसांना उपाशी ठेवतात आणि मेल्यानंतर मोठ्या थाटामाटात श्रद्धा करतात.
'आज इतके कावळे जमले कशाला?
श्राद्ध आहे का उपाशी माणसाचे? '
समाजात भूक दारोदार भटकत असते या भुकेची व्याकूळता त्यांनी अतिशय हृदयस्पर्शी शब्दांत व्यक्त केली आहे.
'अन्न पाण्याच्या दिशेने रोज सरकत राहिले
एक व्याकुळ पोट दारोदार भटकत राहिले '
सुखात साथ देणारे सर्वच असतात. आर्थिक सुबत्ता असेल तर गुळाला माशा चिकटतात त्याप्रमाणे सर्व इष्टमित्र, आप्तस्वकीय आपल्या आसपास फिरतात आणि अचानक दुःखाचे दिवस आले दरिद्रता आली की, सर्वजण आपल्यापासून दूर पळतात. त्यावेळी आभाळाप्रमाणे कोसळलेल्या दुखापेक्षाही जास्त दुःख जवळच्या माणसांच्या वर्तणुकीचे होते. त्यांचे वर्मी लागणारे शब्दबाण काळजावर खोल घाव करतात.
'ओळखीचे लोक माना फिरवती
याहुनी का वेगळे असते जहर? '
'का हवे तलवार किंवा का हवे बर्ची भाले?
काळजाला शब्द चिरती कातडी उसवून कायम '
आई वडील मुलांसाठी किती कष्ट करतात त्यांच्यासाठी आपले सर्व जीवन खर्ची करतात. स्वतः हाल-अपेष्टा सहन करून मोठ्या हौशीने मुलांचे लाड पुरवतात याचे वर्णन करणारे अत्यंत हळवे शेर त्यांनी आपल्या गझलेत आहेत गुंफले आहेत.
'खिसा रिकामा आहे त्याला माहीत असते
बाप पिलांचे पुरवीत असतो लाड तरीही '
'आई पिठात पाणी घालून पाजते
कंगाल लेकराला ती पेज वाटते '
गझल असो वा काव्य छंदोबद्ध लेखनातून उत्स्फूर्तपणे गेयता उफाळून येत असते. गझल हा तर गेय प्रकार! वरकरणी विद्रोह, बंडखोरी प्रवृत्तीचा वाटणाऱ्या गझलेतूनही गेयता आणि गझलेचे हळवेपण संतोष कांबळे यांनी सांभाळले आहे. त्यामुळेच त्यांच्या गझलेत कृत्रिमता जाणवत नाही.
'मोगऱ्याची सावली खेटून आले,
माझिया दारी सुगंधी ऊन आले! '
मोगऱ्याचा गोडवा आणि अमृताचा सुगंध त्यांच्या वरील मतल्यातून दरवळतांना दिसतो. श्रीमंतीच्या सावलीपेक्षा त्यांच्या दारात आलेले सुगंधी ऊन त्यांना अधिक बलवान बनवते. या उन्हाच्या तेजात पोळून त्यांची शब्दरत्ने त्यांची श्रीमंती भरभराटीस नेतात. रसिकवरूपी विश्वंभराची पूजा करणारे संतोष कांबळे यांनी 'तुकोबाच्या कुळाचा वंश' गझल संग्रहातील आपल्या मनोगतातून वाचकांना त्यांची शब्दरत्ने समर्पित केली आहेत.
जीवनावर लिहिलेल्या शेरातून त्यांचा पोक्तपणा, विचारांची प्रगल्भता, अनुभव समृद्धता, स्पष्टपणे जाणवते दुःख,अन्याय, सामाजिक विषमता सोसून त्यांच्या काळजातून रोमांचक शेरांऐवजी विद्रोही शेर स्वयंस्फूर्तीने उफाळून आलेत. तरीही त्यांची शेर हे उपदेशपर सुभाषिते न बनता आशयघन, दर्जेदार तसेच कलात्मकतेतून वाचकांच्या विचारशक्तीवर आपली छाप कायमस्वरूपी सोडणारे आहेत.
'फक्त वाल्याच्याच गोष्टी आजवर आलीस सांगत
तूच लुटले स्वप्न दुनिये जिंदगी अडवून कायम '
वागते ही जिंदगी दररोज माझ्या मालकागत
काय चुकले मी स्वतःला जर तिचा चाकर म्हणालो
'फेकले दाणे शिताफीने जरासे जीवना,
पाखरू भोळे तुझ्या जाळ्यात अडकत राहिले '
जीवनाच्या ग्रंथाचे सखोल वाचन आणि माणसांच्या स्वभाव, मनोवृत्तीचा अभ्यासपूर्ण निरीक्षण संतोष कांबळे यांनी केले आहे. या वाचन, अभ्यासाने त्यांची गझल समृद्ध आणि आशयगर्भित झाली आहे.
गझल ही हळव्या अलवार भावभावनांची गुंफण असते. विद्रोही भावनेतून अंतस्थ एल्गार व्यक्त करतांना गझलेतील हळवेपण, गेयता, रसास्वादात्मकता, स्वाभावीकता, संवादात्मकता हरवणार नाही ह्याची दक्षता घेणे गरजेचे आहे, कारण गझल नेहमी गेयतानुगामी शब्दांची मागणी करत असते.
गझलकार संतोष कांबळे त्यांच्या चिरकाल लक्षात राहणाऱ्या शेरातून रसिक वाचकांना म्हणतात-
'या वहीवर चोख बंदोबस्त ठेवा;
काळजाच्या आत माझा दस्त ठेवा '
गझलकार संतोष कांबळे यांनी पुढील गझल लेखनास अनेक हार्दिक शुभेच्छा!
.................................
गझलसंग्रह : तुकोबाच्या कुळाचा वंश
गझलकार : संतोष कांबळे
पृष्ठसंख्या : ९६
किंमत :१०० रु/ केवळ
प्रकाशन : ऋषी प्रकाशन (पुणे)
मुखपृष्ठ : अरविंद शेलार
No comments:
Post a Comment