माझी आवडती गझल 'रंग माझा वेगळा ' : किरण डोंगरदिवे




'रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा !
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा !

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा !

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन्‌ कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा !

सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा
"चालणारा पांगळा अन्‌ पाहणारा आंधळा !"

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा ! '

- सुरेश भट

माझी एक अत्यंत आवडती गझल म्हणजे 'रंग माझा वेगळा '.अगदी सातवी- आठवीत असताना पासून माझ्या प्रत्येक  वहीवर, आजही कवितांच्या डायरी वर, whats app च्या खात्याच्या about मध्ये, facebook च्या myself मध्ये, इतकेच नव्हे तर गाडीच्या हेडलाईटवर

'रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा ! '

ह्या ओळी मी आवर्जून नोंदविल्या आहेत. खरे म्हणजे हे निस्पृह माणसाचे लक्षण आणि वेगळेपण आहे. तो साऱ्या रंगात रंगूनही वेगळा आहे. प्रत्येक नात्यात, प्रत्येक मोहातही अडकलेला आहे मात्र जेंव्हा त्याच्या मनात येईल तेंव्हा तो हे सर्व नाते आणि त्या नात्याच्या गुंतावळी, सारे मोह लगेच सोडून मोकळा होऊ शकतो. रापलेल्या उन्हात पोळण्याचे शाप भोगणाऱ्या माणसाला सावल्यांचा झळा लागतात, ह्या सावल्या त्याला सहन होत नाहीत. दुःखाची इतकी सवय झालेली असते की त्या दुःखाचा आपल्याला लळा लागतो. काही झाले तरी ते आपला पिच्छा सोडत नाही. ही व्यथा अतिशय मार्मिकपणे कवीने मांडली आहे. त्यात आपली आसवे आपल्या गीताप्रमाणे आपल्या सोबत राहतात ; असे सांगून आपले जीवन, त्यात कविता आणि गीतांचे महत्व आणि त्या गीताच्या तोलामोलाचे आपले अश्रू आहेत असे नमूद करण्यास कवी विसरत नाहीत. ह्या सर्व काळात ह्या सर्व दुःखासोबत कसे आणि कधी जगाया लागलो हे कवींनाही कळत नाही. जगत असताना ज्याला आपण आयुष्य म्हणतो, किंवा सर्वस्व समजतो त्यांनीही आपला गळा कापलेला असतो. मात्र त्याही परिस्थितीत स्वतःला खंबीर ठेऊन जगण्याची कवींची वृत्ती खरोखरच जगण्यासाठी आणि लढण्यासाठी प्रेरणादायी आहे. ह्या जीवनाचे तात्पर्य काय हे सांगणारे खोटे आहेत, अगदी हे तात्पर्य सांगणाऱ्या दिशा असल्या तरी त्या आपल्या जीवनाबद्दल खोटी माहिती देतात असे कवी सांगतात. जीवनाच्या ह्या संघर्ष यात्रेत माझ्या बरोबरीने कोणी चालू शकत नाही जो तो पांगळा आणि आंधळा आहे असे वाटू लागते. माणसाच्या मध्यरात्री म्हणजे जिथे माणुसकीचा अंधार दाटला आहे तेथे आपण सूर्याचे म्हणजे प्रकाश देण्याचे कार्य करतो आणि मला असे पेटून उठण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची किंवा सोहळ्याची आवश्यकता नसते. ही जगण्यातील वेगळेपणा जपणारी कविता असून स्वतःच्या मर्जीने जगणे, दुःखाला सामोरे जाणे ह्या भावना त्यात आहेत. ही कविता माझ्या जीवनात अनन्य साधारण महत्व ठेऊन का आहे ह्याचा विचार प्रत्येक कडव्यानुसार एखादेवेळी मला करावा वाटतो.

'रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा !
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा ! '

प्रत्येक व्यक्ती ही एक वेगळे अस्तित्व राखून आणि जपून असते ;तसे स्वतःच्या अस्तित्वाचे वेगळेपण मीही जपलेले आहे. तेही अगदी लहानपणापासून. वयाच्या  बाराव्या वर्षी आई सोडून गेली तेंव्हा इतरांच्या सारखा मी ओक्साबोक्सी रडत नव्हतो तर रडणाऱ्या बापाला तुम्ही रडू नका असे सांगत होतो. पुढे नात्याच्या गुंतावळीत प्रत्येक नात्याला जपण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असताना, एका क्षणात ज्यांना आपण नको आणि आपल्याला जे नकोत ; त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचा पुन्हा मला पश्चाताप जीवनात कधीही झाला नाही. मग ते बंधन कोणतेही असो मला त्या गुंत्यातून सहजपणे पाय मोकळा करता येतो,असे आता वाटते. ह्या जीवन संघर्षाच्या उन्हाची इतकी सवय झाली की सावल्यांचा त्रास होऊ लागतो,सुखाचा त्रास वाटावा इतका दुःखाचा मला आणि दुःखाला माझा लळा लागला आहे. म्हणून कवी म्हणतात त्याप्रमाणे

'कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा ! '

'राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा ! '

सुरेश भट ह्यांना जसा त्यांच्या गीताचा आणि काव्याचा दिलासा होता तसाच दिलासा मलाही माझ्या कविता देतात.माझ्या कविता आणि माझ्या अश्रूमध्ये मी कधी कुणाला वाटेकरी होऊ दिले नाही. ह्या सर्व वेदना आणि दुःखासह मला जगण्याची सवय झाली आणि दुःखातूनच पुढे चालण्याची उर्मीही मिळाली. आयुष्यात सर्वसामान्यांच्या प्रमाणे मीही अनेकांना आपले समजले आणि त्यांनी केसांनी गळा कापावा तशी फसवणूक केली म्हणून सुरेश भटांच्या पुढील ओळी मलाच नव्हे तर कुणालाही स्वतःच्या जीवनाचा आरसा वाटाव्यात अशा आहेत -

'कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन्‌ कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ! '

बरे ह्या जगण्याचे भोगण्याचे साक्षीदार असणारे आपल्या जगण्याचा खरा अर्थ काढतही नाहीत, समजूनही घेत नाहीत, आणि जो खोटा अर्थ त्यांनी समजून घेतला तोच सर्वाना सांगत सुटतात. त्यामुळे माझ्याबद्दल लोक जे बोलतात ते नक्कीच खरे नव्हे हे सर्वाना निक्षून सांगावेसे वाटते. मग सुरेश भटांच्या पुढील ओळी आणखी आपल्या वाटू लागतात.

'सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा
"चालणारा पांगळा अन्‌ पाहणारा आंधळा !"

ज्याने आपल्याला पाहिले तो आंधळा होता आणि आपल्या सोबत चालणारा पांगळा होता असे वाटायला लागते. आणि असे सर्व असताना माणुसकीहीन, संवेदनाहीन अंधारात आजही उजेड पेरण्याचे, नव्हे स्वतःच्याने जितके चांगले होईल तेवढे चांगले कार्य करून स्वतः चे कर्तव्य, सामाजिक, कौटुंबिक, राष्ट्रीय जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पाडतो.

'माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा ! '

मी आजही माणुसकी सोडलेली नाही आणि मला कोणतेही कार्य करण्यासाठी कोणत्याही मोठेपणाची आणि मानसन्मानाची गरज नाही. खऱ्या अर्थाने एखादी काव्यरचना आपल्याला आपली का वाटते? तर त्यात आपल्याला आपले प्रतिबिंब दिसते म्हणून ! मग 'रंग माझा वेगळा ' मध्ये मी मला शोधले तर चुकले का ?
.................................
किरण शिवहर डोंगरदिवे
वॉर्ड न 7 समता नगर, मेहकर
ता मेहकर जि बुलडाणा पिन 443301
मोबा न 7588565576

No comments:

Post a Comment