संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्यावर निस्सीम प्रेम करतो.जे गझल विश्वातले दीपस्तंभ ठरले, त्या सुरेश भटानंतराच्या पिढीत जी नावे अग्रक्रमाने येतात त्यातीलच एक इलाही जमादार गझलेच्या सुगंधात..रदीफ काफियांच्या पाकळ्यांनी सुशोभित ज्यांची प्रत्येक गझल म्हणजे वेगळ्या सुगंधाचे पुष्पच आणि त्यातील गझलीयत म्हणजे रसिक हृदयाचा ठाव घेणारा मकरंदच....जो चाखायला प्रत्येक रसिक भ्रमर तत्पर असतो.अशाच एका अवलीया गझलकारास आपण नुकतेच पारखे झालो.ते ज्येष्ठ गझलकार म्हणजे इलाही जमादार. त्यांचीच एक गझल घेऊन मीआपल्या समोर प्रस्तुत झाली आहे.गझलेच शीर्षक आहे 'एकाकीपण'.
ज्यांनी आयुष्यात खरोखर एकांत वास भोगलाय त्यांची लेखणी एकांत वास मांडणारच.तसं पाहिलं तर हा एकांत वास प्रत्येकजणच भोगतो.कधी कधी तो हवा हवासा वाटतो तर कधी अतिशय जीवघेणा.असाच एकांत प्रस्तुत गझलेत मांडला आहे.
एकाकीपण
'प्राजक्ताच्या झाडाखाली टपटपणारे एकाकीपण
निरोप तू घेताच बिलगले धगधगणारे एकाकीपण '
माणसाच्या मनात जेंव्हा एकाकीपण घर करून राहतेना..तेव्हा त्यांची नेमकी मनोवस्था काय असते याचं
वर्णन जमादारांनी अगदी नेमक्या आणि नेटक्या शब्दात केलं आहे.आपली प्रिय व्यक्ती आपल्या पासून
दुरावते..निरोप घेते..कधी कधी तो निरोप कायमचा दुरावा असतो तर कधी कधी तो निरोप जगापासूनच घेतलेला असतो.आणि आपली हृदयस्थ व्यक्ती जेंव्हा असा निरोप
घेते तेंव्हा प्राजक्ताची फुले टपटप करत खाली पडतात अगदी तसेच एकांत ही टपकतोय आणि अश्रु होऊन ओघळतोय अशी उत्कट विरह,एकांत भावना कवी इथे मांडून जातात.
'पानगळीच्या मोसमापरी गळू लागले तारे आता
कसे थोपवू उल्केसम हे कोसळणारे एकाकीपण ? '
आयुष्यातली प्रत्येक प्रिय व्यक्ती एकेक करून निघून जाते तेव्हा कवी असं म्हणतात की जणू पानगळीत झाडाची पाने जितक्या पटकन आणि सहज गळून पडतात तितक्याच सहज नि पटकन आयुष्यातले तारे निखळून गेले आहेत आणि एखादी उल्का कोसळावी तेवढ्या मोठ्या प्रहाराने हे एकाकीपण धाडकन हृदयावर कोसळलं आहे. ते कसं रोखायचं,थोपवून धरायचं हे काही उमगत नाही.. एकाकी माणूस किती हतबल होतो.. खचून जातो...याचं हृदयस्पर्शी वर्णन या शेरात केलेलं आहे.
'अशी कशी रे तुझी सावली माझ्या वरती पडली सूर्या?
तुझ्यासारखे माझ्या सोबत वावरणारे एकाकीपण '
सूर्याचीच सावली जणू माझ्यावर पडली आहे. त्याच्यासारखीच एकाकी पणाची धग घेऊन मी ही जगतोआहे.. अशा मार्मिक रुपकाद्वारे आपल्या भयाण एकांताची मांडणी जमादार इथे करून जातात.
'एकदाच तू पुन्हा भेटशील अनोळखी माणसाप्रमाणे
दिसेन तुज मी...दिसेल का पण गोठवणारे एकाकीपण ? '
कदाचित पुन्हा एकदा नव्याने अनोळखी होऊन आपण भेटू !तेव्हा तुला मी दिसेन..अगदी व्यवस्थित दिसेन.. पण मला पोखरणारं माझं माझ्यातच गोठलेलं एकाकीपण तुला दिसेल,जाणवेल का..?असा प्रश्न कवी विचारतात. कारण माणसाच्या एकाकीपणाचे युद्ध त्याच्या चेहऱ्यावर कधीच दिसत नाही..ओळखूही येत नाही.
'अश्वत्थाम्या !अशी कोणती जखम तुझी तहहयात होती ?
माझ्या माथी सदैव आहे भळभळणारे एकाकीपण '
या एकाकीपणाला कंटाळून कवी विचारतात अरे अश्वत्थाम्या तू कपाळावर कोणती जखम घेऊन वावरतोस..जी चिरंजीव आहे.आणि मी सुद्धा एकाकीपणाची ही भळभळणारी जखम घेऊन वावरत असतो.कवी येथे स्वत: च्या दु:खाची तुलना अश्वत्थाम्याशी करून वेदनेचा संबंध चिरंजीवत्वाशी जोडतात.
'तुझ्या स्मृतींच्या सरणावरती क्लांत पहुडले काळिज माझे
वाऱ्यावरती राख चितेची सावडणारे एकाकीपण '
कवी आपल्या प्रिय व्यक्तीला म्हणतात..तुझ्या स्मृतींच्या सरणावरच माझं काळीजही पहुडलं आहे.आणि
माझे एकाकीपणसुद्धा तुझ्या चितेवरून जाणाऱ्या वाऱ्यावरची राखसुद्धा सावडणारे असे माझे एकाकीपण आहे...असा उत्कट नि भयाण एकांत इथे व्यक्त केला आहे.
'नयनामधले स्वप्नोत्सव अन हृदयामधल्या गझलमैफली
तिथेच आता स्मशानापरी जाणवणारे एकाकीपण '
एक काळ होता जेंव्हा स्वप्नातही उत्सव असायचेआणि डोळ्यातही गझलेच्या मैफिली रंगायच्या..पण
आता मात्र तिथेसुद्धा स्मशानासारखे एकाकीपण जाणवते...इतकं एकाकीपणाने व्यापलं आहे.
'वाटेनेही दगा दिल्यावर वाटसरूने काय करावे ?
चकव्यामधला प्रवास माझा झपाटणारे एकाकीपण '
जर वाटेनेच दगा दिला तर वाटसरूने काय करावं ?..हा हृदयभेदक सवाल कवी विचारतात.हे आयुष्य म्हणजे चकव्याचा प्रवास झालंय..एखद्या भूताने झपाटावं तसं एकाकीपणाने मला झपाटलं आहे हे विदारक भाव त्यांनी प्रस्तुत शेरात मांडले आहेत.
'दिवस कशाचा?अवस असावी ; किरण कवडसा काही नाही
जंगलातल्या रातकिड्यासम किरकिरणारे एकाकीपण '
हे एकाकीपण दिवसासारखं नाही तर भयंकर अशा काळ्याकुट्ट अमावस्येच्या रात्रीसारखं आहे. जंगलातल्या रातकिड्यासारखं हे एकाकीपण सतत मनात घोंगावत असतं.
'एकांताच्या कुशीत शिरता आकांताने ऊर फाटतो
कोठे लपवू ?कसे थोपवू पाझरणारे एकाकीपण? '
या एकांतात गेल्यावर कधी कधी इतकी बिकट अवस्था होते की आकांताने ऊर फाटतो.तरीही न थांबवता येणारं एकाकीपण हृदयात खोल खोल पाझरत जातं.
'हलाहलाचे कितीक प्याले एकदाच तू रिचविलेस पण
सांग शंकरा !पचवशील का जळजळणारे एकाकीपण ? '
हे शंकरा,हलाहलाचे कितिक प्याले तू पचवलेस पण ते एकदाचना..पण आयुष्यभर या एकांताचं विष खरच तू तरी पचवू शकशील का? असा प्रश्न ते थेट शंकरालाच विचारतात.
'समीप असुनी तुझ्या इलाही घोंगावे अंतरी दुरावा
संपवेल मज प्रलयंकारी जाणवणारे एकाकीपण ! '
शेवटच्या शेरात इलाही म्हणतात, तुझ्या एवढ्या जवळ असूनही तुझा दुरावा माझ्या मनात घोंघावत राहतो.हे प्रलयंकारी वाटणारे एकाकीपण मला संपवल्याशिवाय राहणार नाही.
प्रस्तुत गझलेत एकाकीपणाचं मनोविश्लेषण इलाही करतात.अगदी एखाद्या मनोवैज्ञानिकानेही अभ्यासावे असे हे विश्लेषण आहे.एकाकीपणाचे किती रंग त्यांनी या गझलेत मांडले आहेत.
इलाहींच्या लेखणीस आणि त्यांच्या साहित्यिक योगदानास मानाचा मुजरा.
.................................
रोहिणी पांडे,नांदेड
माझ्या आवडत्या मराठी गाजलांपैकी एक ! धन्यवाद !
ReplyDelete