सिमटे तो दिले - आशिक ,फैलै तो ज़माना है : डॉ. संगीता म्हसकर



भाषेच्या नजाकतीतून तर कधी स्वरांच्या लडिवाळ हरकतीतून गझलची भेट होते.

'ऐ मोहोब्बत तेरे अंजाम पे रोना आया,
जाने क्युं आज तेरे नाम पे रोना आया.. '

असा दर्द घेऊन, मनाच्या तारा छेडत,आयुष्याच्या एखाद्या वळणावर गझल भेटते.आणि बघता बघता आपल्या हृदयात तिची खास अशी जागा निर्माण करते.
गझल दृष्टीला पडते  ती नेहमीच एखादी लावण्यवती झिरझिरीत पडद्याआड दिसावी आणि हुरहूर लावून जावी अशी !
अर्थात पहिल्या भेटीत गझलचा आपल्याला उलगडलेला अर्थ म्हणजे तिची एखादी झलक असते असं म्हणता येईल. कारण गझलला अजून खूप काही सांगायचं असतं . 'गागर मे सागर 'असं अत्यंत व्यापक आणि सर्वसमावेशक असं तिचं स्वरूप असतं. गझलेतला एखादा शेर आपल्याला आवडतो याचं कारण खूप वेळा त्यातली घटना आपल्या किंवा  कदाचित आपल्या प्रिय व्यक्तीच्या संदर्भात घडलेली असते .म्हणून कळत नकळत आपण त्या भावनेशी एकरूप होतो.तिची तीव्रता आपल्याला स्पर्शून जाते.मात्र,एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे  गझल  इथे संपलेली नसते.तर खऱ्या अर्थाने तिची सुरुवात झालेली असते. कारण एखाद्या निवांत क्षणी त्या गझलेतला आपल्याला आवडलेला   शेर आपल्याला आठवतो तेव्हा त्यातले यापूर्वी लक्षात न आलेले कितीतरी अर्थ आपल्याला उलगडू लागतात. आधी न जाणवलेल्या अनेक छटा आपल्या लक्षात येतात आणि मनाला आश्चर्यचकित करतात .म्हणून तर कविता आणि गीतांच्या इतर असंख्य प्रकारातही गझल आपलं लक्ष वेधून घेते .
खरं तर कविता किंवा गीत या पलीकडे जाऊनही गझलला एक स्वतंत्र अस्तित्व आहे. स्वतःचं व्यक्तिमत्त्व, स्वतःचा असा वेगळा चेहरा आहे. 
आपल्या अंतरंगाचा एकेक पैलू उलगडणारी गझल आपल्या आयुष्यासोबत केव्हा एकरूप झाली कळले देखील नाही.म्हणूनच सुरेश भट म्हणतात की गझल ही जीवनशैलीच आहे. 
प्रेम हा गझलचा आत्मा, खरं तर प्रेम ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट !मनातली सगळ्यात उदात्त अशी भावना म्हणजे प्रेम !  प्रेम वजा केलं तर आपल्या आयुष्यात उरतच काय ?अर्थात या प्रेमातून निर्माण झालेली गझल, आपल्या आयुष्याचं प्रतिबिंब आहे असं आपण म्हणू शकतो. 
मात्र आयुष्याचे इतर रंग देखील, गझल तितक्याच ताकदीने व्यक्त करते हे तिचं वैशिष्ट्य.
थोडक्यात,आपल्या आयुष्यासोबत एकरूप झालेल्या गझलेत प्रेमा व्यतिरिक्त इतर सर्व रसांची प्रचिती येत असली तरी प्रेम हा तिचा स्थायीभाव आहे .
तरीही एक प्रश्न उरतो, तो म्हणजे इतर अनेक कविता आणि गाण्यांमध्ये प्रेम हा विषय मोठ्या प्रमाणावर सतत येत असतोच, मग गझलचे वेगळेपण काय ? याचं उत्तर  गझलेतून देताना जिगर मुरादाबादी लिहीतात,

'इक लफ्ज़े मोहोब्बत का अदना यह फंसाना है
सिमटे तो दिले - आशिक ,
फैलै तो ज़माना है'

गजलेतल्या  प्रेमाचं हे नेमकं वर्णन ! अर्थात प्रेम ही अशी गोष्ट आहे जेव्हा ती सूक्ष्म रूप धारण करते तेव्हा ती प्रेमिकाचं हृदय बनते आणि जेव्हा ती विस्तार पावते तेव्हा मात्र अवघ्या विश्वाला व्यापून उरते.गझलेतून व्यक्त होणाऱ्या या  प्रेमाला अनेक पैलू असतात.
इश्क,हा उर्दू गझलेतला अत्यंत महत्त्वपूर्ण असा संकेत आहे.
इश्के़ मजा़जी़ पार्थिव प्रेम आणि इश़्के हक़िक़ी पारमार्थिक प्रेम अशा दोन पातळ्यांवर अभिप्रेत असलेल्या या प्रेमातून गझलचे अनेक लाक्षणिक अर्थ सूचित होतात.
गझलेतल्या प्रत्येक शब्दात एक गूढ असा अर्थ दडलेला असतो. म्हणूनच गझलेतून व्यक्त होणार्‍या प्रेमाची व्याप्ती ही विलक्षण असते .मनातल्या तरल संवेदनांना स्पर्श करणाऱ्या या प्रेमाच्या  छटा अनेक असतात किंवा अथांग असतात .
प्रेयसीच्या प्रेमाची नाजूक किनार लाभलेल्या या प्रेमाची वाटचाल विशिष्ट वळणावर एका वेगळ्याच दिशेने होऊ लागते .प्रेमाची ही उत्कट अनुभूती अशा उदात्त पातळीला जाऊन पोहोचते जिथे तिला आत्मकेंद्रित भावनांचा जणू विसर पडतो, व्यापक होत जाणाऱ्या या प्रेम भावनेला नकळतच वैश्विक जाणिवांचा स्पर्श होतो, आणि तो गझलेतून व्यक्त होतो .प्रेमाची ही भव्यता अवघ्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देते. त्या प्रेमाच्या सफलतेच्या किंवा विफलतेच्या पलीकडे जाऊन ही अनुभुती, त्या प्रेमभावनेवरच प्रेम करु लागते. आणि तेव्हाच मग कमीत कमी शब्दात, संकेतांच्या अन प्रतीकांच्या माध्यमातून पुढे जाणाऱ्या गझलची धुंदी आपल्या अस्तित्वाला व्यापून टाकते.

No comments:

Post a Comment