तीन गझला : मनोज सोनोने


१.

जीवनाचा भार अवघड
प्राक्तनाचा मार अवघड

माय होणे फार सोपे
बाप होणे फार अवघड

जिंकली युद्धे कितीदा
सोसणे पण हार अवघड

हात हाती घेउनी बघ
सोडणे संसार अवघड

मोक्ष नाही त्या जिवाला
पाप भरणे फार अवघड

सोड तू लाचार जगणे
घे जरा निर्धार अवघड

खेळला तू खेळ मोठा
झेल आता वार अवघड

२.

तू म्हणजे उन्हातली हिरवळ
तू म्हणजे प्रेमाचा दरवळ

भेटलीस या जन्मी मजला
वसंतातली कळली सळसळ

फुले कशाला तोडू चमचम
ओठांवरती ममतेचा घळ

थिटे वाटले सोने-चांदी;
जेंव्हा कळली सगळी चळवळ

माळ सुगंधी गजरा तूही;
तेंव्हा कळेल तुजला जळजळ

अता नको बोलू काहीही;
ओकत असते दुनिया मळमळ

३.

दबंग व्हावे लागते कधी
भणंग व्हावे लागते कधी

सत्यास सिध्द करण्यासाठी
अभंग व्हावे लागते कधी

सूर निराशेचे उठल्यावर
मलंग व्हावे लागते कधी

आयुष्य हेलकावे खाता
तरंग व्हावे लागते कधी

रंग आणावया जीवनात 
निरंग व्हावे लागते कधी

अंतर दोघातले मिटविण्या
लवंग व्हावे लागते कधी

2 comments:

  1. Apratim Ani sudar.... Lines are bit small in size but each word having deepest meaning

    ReplyDelete