तीन गझला : प्रतिभा सराफ


१.

जरी असे अशी-तशी तुझीच मी!
तुलाच गोंदले उरी तुझीच मी!

उजाडतो तुझ्यासवे दिवस इथे
पहाटच्या दवापरी तुझीच मी

दुपारच्या उन्हात उब ही तुझी
सुखावते उन्हातही तुझीच मी

धपापतो उरात श्वास साजणा
कवेत शांत मज करी तुझीच मी

न भेटला न बिलगलास राजसा
न स्पर्शता शहारली तुझीच मी

सभोवती तुझ्यासवे उनाडते
लबाडशी परी जशी तुझीच मी

हसू नको, रडू नको, जगू कशी?
तुझ्याविना फुलू कशी?तुझीच मी

लहानशी गझल तुलाच वाहते
कबूल तू महाकवी तुझीच मी

२.

पाऊस बोलतो आहे संवाद साधतो आहे
माझ्याच मुक्या बोलांना थेंबात ओवतो आहे !

पाऊस असा येताना,मातीत खोल रुजताना
हृदयात कोंब प्रेमाचा अलवार उगवतो आहे!

पाऊस बांधतो तोरण दारात लाखमोलाचे
बाहेर आत सौख्याचे संसार फुलवतो आहे!

पाऊस आज आलेला घेऊन गंध मातीचा,
भावूक ओल जगण्याची श्वासात गुंफतो आहे

पाऊस गात येताना धरतात ताल पानेही
मिसळुनी सूर वाराही गाण्यास सांगतो आहे

पाऊस कधी एकांती विरहाच्या कातर राती
सोबतीस आता माझ्या पाऊस जागतो आहे

३.

झाल्या चुका असू दे रस्ता नवा धरू या
हळुवार आठवांनी जखमा जुन्या भरू या

लटकाच राग माझा धरलास का अबोला?
तू मौन सोड आता, संसार सावरू या

मिटवू अता दुरावा, नैराश्य, राग सारा
घरट्याकडे वळू या,ये प्रेम अंथरू या

चाहूल पावसाची मनमोर धुंद झाले
हातात हात धरुनी थेंबात मोहरू या
                               
पदरात बांधले मी अंधार भोवतीचे
वस्तीत चांदण्यांच्या निर्भीड वावरू या

उरले तुझे नि माझे आयुष्य फार थोडे
दुःखास ठोकरू या सौख्यास पांघरू या

.................................
प्रतिभा सराफ
pratibha.saraph@gmail.com
98925 32795

3 comments: