दोन गझला : सौ. वैशाली भागवत


१.

पाहिली स्वप्ने तळाशी गाडताना   
उंच झाला ढीग त्यांचा  बांधताना  

वाटले सारेच माझे संपले की   
फक्त ‘देह’च राख झाला जाळताना  
 
व्यापतो आहेस तू जर या जगाला 
वेगळा दिसतोस का तू पूजताना 
  
चेहऱ्यावर हास्य होते मांडलेले  
कोणता कप्पा मनाचा सांधताना 

या नदीला काय झाले कोण जाणे  
का अशी वेडावली ती वाहताना 

२.

थोडेसे शिंपडले अत्तर  मी नात्यावर
नोंद सुगंधी दुःखाची झाली नावावर

अधे मधे का फितूर होते मन माझ्याशी
कसे कधी ते तुझेच होते तू दिसल्यावर 

पापणीत स्वप्नांना उगाच का सांभाळू ?    
गरज तशी पण कशास त्यांची तू असल्यावर 

सजलेल्या भिंतींना म्हटले घर सर्वांनी 
कोनाडे भिंतींचे दु:खांनी भरल्यावर 

भाळावर दैवाने काहीसे लिहिताना 
नाव तुझे मी कोरत आले त्या भाग्यावर 
.................................
सौ.वैशाली भागवत , बडोदे

9 comments:

  1. वाह! दोन्ही गझल सुरेख 👌

    ReplyDelete
  2. प्रिय वैशु, दोन्ही खूपच अप्रतीम गझल..

    ReplyDelete
  3. अप्रतिम गझल दोन्ही.वैशालीताई, खूप सुंदर, भावस्पर्शी.

    ReplyDelete