१.
मित्रासम ते रिपू वागतिल मी गेल्यावर
पार्थिव माझा ओला करतिल मी गेल्यावर
सालांपासुन अबोल होते ओठ जयांचे
पुळका येऊन ते बडबडतिल मी गेल्यावर
मानाअपमानाचे फटके किती झेलले
होती प्रेमळ नक्की म्हणतिल मी गेल्यावर
त्यांचा करुनी विचार जगले उंबरठ्यातच दारे दाही दिशा उघडतिल मी गल्यावर
कुचकामी हे जगणे होते रोज परीक्षा जीवन-मृत्यू मिठी मारतिल मी गेल्यावर
महत्त्व येईल अमाप माझ्या डायरीस त्या
अक्षरलेणे माझे उरतिल मी गेल्यावर
तेरा दिवसांनी वा तेरा महिन्यानंतर
उपचारही ते सारे सरतिल मी गेल्यावर
२.
फुलाया लागला जेव्हा तिथे अंगणात गुलमोहर
जळाया लागला तेव्हा तुझ्या देहात गुलमोहर
जरी वैशाख वणव्याची अशी बेभान लाट आली
तरी झुलतोच डौलाने दीन वस्त्यात गुलमोहर
उन्हे आली, विजा पडल्या ,किती अश्रू इथे ढळले
नसे परवा बघा फुलतोय संसारात गुलमोहर
जगाने लादली येथे कशी बेकायदा बंदी
कशी सांभाळते बघ ती तिच्या पदरात गुलमोहर
उडून गेले रंग सारे तरी झुलतो मनी झोका
वयाचे भान नसतांना तिच्या नादात गुलमोहर!
अचानक भेटला तेव्हा लाजुनी लाल झाली ती
तिचा झाला क्षणातच मग तुझ्या पाशात गुलमोहर
No comments:
Post a Comment