तीन गझला : प्रियंका गिरी

१.

वाद बोलके बरे टाळतो आपण दोघे
मौन पाळुनी किती बोलतो आपण दोघे

सहज बोलतो किंचित हसतो येता-जाता 
परकेपणास किती पाळतो आपण दोघे

तुला तसे ते फार मलाही ठाउक नाही
खरे नि खोटे किती वागतो आपण दोघे

दोघांमधली कथा कुणाला कळते जेव्हा 
इतरांसाठी रंजन ठरतो आपण दोघे

कवितांनाही सलते जेव्हा अपुले नाते
शब्दांना मग शब्द जोडतो आपण दोघे

कोण चुकीचे कोण बरोबर हिशोब ठरवत 
कितीक रात्री जागत बसतो आपण दोघे

कोणी नसतो कोणाचाही कळते जेव्हा
दोघांसाठी केवळ उरतो आपण दोघे

२.

ती प्रेमाने पाहुन हसली
लोक म्हणाले वेडी कुठली

सभेत त्याने व्यथा मांडल्या
मागे थोडी खसखस पिकली

नकोस जाऊ तिच्या घरी तू
तिने कधीची स्वप्ने विकली

बाभळीस ज्या दोर बांधला
ती फांदी का नव्हती तुटली

आई जेव्हा बेघर झाली
क्षणभर होती धरणी हलली

सांग येउ का तुझ्यासवे मी
कारण माझी गाडी हुकली

३.

तुला बघितले धडधड झाली
मनात माझ्या गडबड झाली 

जीव ओतुनी कविता लिहिल्या
इतरांसाठी बडबड झाली 

ज्या आईने तुला जगवले 
आज तुला का ती जड झाली

अबोलाच हायसा वाटतो
नाती इतकी अवघड झाली 

बालपणातच जीवन जगलो
नंतर अवघी धडपड झाली 

किती सहज तू प्रश्न टाळले
उरात माझ्या पडझड झाली

  

No comments:

Post a Comment