तीन गझला : रोशनी कडू


१.

या मातीला  झिजणे कळले, रडणे कळले  नाही
वा-याला या मातीचे हळहळणे कळले नाही

निवण्यासाठी धरती सारी   केवळ ढग हे विरले
सूर्याला का मातीचे   धगधगणे कळले नाही

भेटीसाठी झुरणे त्याचे भेटीसाठी तपणे 
मातीलाही सूर्याचे हे जळणे  कळले नाही

सरसर आल्या श्रावण धारा छत्री ओली झाली
श्रावण येता वेड्यांना या भिजणे कळले नाही

लढता लढता मरता आले पळता आले नाही
तलवारीला संकट येता लपणे कळले नाही

२.

मोडू नकोस आता अर्ध्यात डाव माझा
ये पावसा जरा घे  टप्प्यात गाव  माझा

गेला कधीच आहे निसटून पावसाळा
सांभाळतो तरीही सुकला तलाव माझा

मी स्वप्न पाहिले ते हिरवी शिवार शेती
जपतो अजून आहे ,हिरवा स्वभाव माझा

मज वाचतील काही अन् टाळतील काही
कळला अजून कोठे लोकांस भाव माझा

बागेस जाग देतो श्वासास गंध देतो
त्या मोग-याप्रमाणे आहे प्रभाव माझा
 
नाराज फार झाले  सारेच भोवतीचे
केव्हाच बंद केला मी हा लिलाव माझा

गाळून घेतले मी केव्हाच आसवांना
गझलेत वाहताना होतो निभाव माझा

३.

तुझा स्पर्श होता कहर काल झाला
मुक्या भावनांचा गजर काल झाला

तुला काय सांगू कशी रात्र गेली
असा पावसाळी असर काल झाला

मला वागणे हे पटेना तुझे रे
किती साल गेले हजर काल झाला

नसे चंद्र त्याचा जरी जाणतो हे
तिला भेटताना विसर काल झाला

असा जीवघेणा तुझा तो इशारा
उभ्या यौवनाचा बहर काल झाला

किती आर्जवे मी करी साजणाला
तरी डाव त्याचा जबर काल झाला

तिने वाचला जो तुझा शेर जेव्हा
जसाच्या तसा तो,अमर काल झाला

No comments:

Post a Comment