१.
वेळेसोबत सरली नाती
नावापुरती उरली नाती
संकट आले घरात जेव्हा
कामापुरती धरली नाती
पैसा हाती आला तेव्हा
चहुबाजू मोहरली नाती
जुनी उधारी मागू म्हणता
हादरली चाचरली नाती
नाही कोणी अपुल्यासाठी
द्वेषाने पोखरली नाती
पुण्य असावे गतजन्माचे
मैत्रीने मंतरली नाती
नकोच चिंता वर्षा आता
दुःखाने सावरली नाती
२.
वार काट्यांचे जरी, तू आसवे गाळू नको
बंधने साऱ्या जगाची व्यर्थ तू पाळू नको
घे भरारी तू अशी की शांतही राहू नको
अंतरीचा ध्यास घे,हृदयास तू जाळू नको
रातराणीच्यासवे गंधाळ वेडी यामिनी
झोपलेली रात्र सारी कुंतली माळू नको
सांजवेळी हळुच येतो लोभनांचा घोळका
लांब हो तूही जराशी,व्यर्थ तू भाळू नको
काळजीची कुंपणे काट्यापरी का बोचती
जन्मदाती सावली वेडे कधी टाळू नको
३.
मनासारखे आता कोणी उरले नाही
कुणासारखे आता कोणी उरले नाही
देहावरती कोऱ्या होती साथ तुझी अन
तुझ्यासारखे आता कोणी उरले नाही
झरझर झरल्या डोळ्यांमधुनी चिंब सरीही
नभासारखे आता कोणी उरले नाही
जो तो उठतो बंड करूनी पेटत आहे
जळासारखे आता कोणी उरले नाही
रसाळ वाणी,रसाळ गाणी कुठे हरवली
फळासारखे आता कोणी उरले नाही
कैक शहाणे अवतीभवती दिसू लागले
खुळ्यासारखे आता कोणी उरले नाही
हिशोब होते नवीन सारे सुखदुःखाचे
जुन्यासारखे आता कोणी उरले नाही
मृत्यूलाही भीक मागते हसून 'वर्षा'
भिण्यासारखे आता कोणी उरले नाही
No comments:
Post a Comment