तीन गझला : रजनी निकाळजे

१.

मला स्मरावे कधी तरी तू
समोर यावे कधी तरी तू

सुगंध येतो तसेच यावे
मिठीत घ्यावे कधी तरी तू

दिलेस जे तू सुखात अश्रू
जरा टिपावे कधी तरी तू

मला फुलांच्या नकोत बागा
मनी फुलावे कधी तरी तू

सुखास माझ्या नकोस टाळू
सवे झुलावे कधी तरी तू

हवा गुलाबी, निशा गुलाबी
गुलाब व्हावे कधी तरी तू 

नकोस जाऊ असाच वेड्या
जरा भुलावे कधी तरी तू

२.

वेदनेशी बोलते आयुष्य माझे
पण तरीही हासते आयुष्य माझे

चारचौघी सारखा शृंगार माझा
भिंग मजला दावते आयुष्य माझे.

गुज मनाचे सांगते मी सागराला
नाविकाशी बोलते आयुष्य माझे.

रोज फुटक्या आरशाला पाहताना
चेहरा न्याहाळते आयुष्य माझे.

मी सुईने टाचलेले स्वप्न माझे
चंद्रमौळी भासते आयुष्य माझे

दोष मी दैवास देणे बंद केले
कर्म करण्या धावते आयुष्य माझे

शब्द रजनी घालते रूंजी मनाला
अक्षरांशी खेळते आयुष्य माझे

३.

मना सारखे मस्त जगावे असे वाटते
पंख लावुनी नभी उडावे असे वाटते

आयुष्याचा गोणपाट मी विणते आहे
सुख दुःखाला गुंफत जावे असे वाटते

दुनियेमधली दुनियादारी सोडुन द्यावी
फक्त स्वतःवर प्रेम करावे असे वाटते

फिरताना मी संथ वाहत्या नदी किनारी 
झुळझुळणारे पाणी व्हावे असे वाटते

गाण कोकिळा गाणे गाता दुःख विसरते
मीही आता गाणे गावे असे वाटते

आयुष्याशी लढणे मजला जमले नाही
पण शांतीचे युद्ध लढावे असे वाटते

ह्रदयावरती प्रेमाचे मी वार झेलले
पलटवार मी त्यास करावे असे वाटते
..........................................
रजनी निकाळजे
 (शब्द रजनी) 
मुंबई

3 comments:

  1. वाह वाह रजनी ताई.. अतिशय सुरेख... - स्वाती शृंगारपुरे

    ReplyDelete