तीन गझला : डॉ. सुभाष कटकदौंड


१.

शक्य नव्हते थांबणे वेगात होतो
ना कळाले कोणत्या शोधात होतो

ना कुणाचे ऐकले आयुष्यभर मी
त्यामुळे मी नेहमी वादात होतो

राहिलो अनभिज्ञ मी साऱ्या जगाशी
जाहलो बंदी घराच्या आत होतो

साधला संवाद जेव्हा मी स्वतःशी
मी स्वतःला भेटलो माझ्यात होतो

खंत नव्हती वादळाने काय नेले
शांत झाले याच आनंदात होतो

२.

सोबती नाही कुणीही भेटला
हात मी माझाच हाती घेतला

काळजाशी घाव जेव्हा लागला
शब्दही ओठात माझ्या फाटला

वाद माझ्याशी जसा मी टाळला
शब्द माझा वेळ माझा वाचला

आज झाले दुःख माझे कोरडे
आसवांचा खेळही मग थांबला

जायचे होते तिथे मी पोचलो
पावलांचा वेग नाही मोजला

३.

पुरे वाद आता जुना आपला
नसे फायदा ना तुला ना मला

जरी शब्द ओठी मुका लाजला
सखे भाव डोळ्यात मी वाचला

ह्रदय चोरते ना खबर ना पता
सखीला शिकवली कुणी ही कला

तिला भावली वाट ती वेगळी
जुना मार्ग मीही पुन्हा शोधला

मनाचे जरा दार उघडेन पण
कळाया हवे कोण आहे भला

.................................
- डॉ. सुभाष कटकदौंड, खोपोली
मो. ९५६१२८४४०८

6 comments:

  1. खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन

    ReplyDelete
  2. हार्दिक अभिनंदन...! सर.

    ReplyDelete
  3. फारच छान

    ReplyDelete
  4. खुप खुप सुंदर सर

    ReplyDelete
  5. वाहह....अप्रतिम तिघही गझल रचना...

    ReplyDelete