१.
जसे घडवायचे ठरले तसे काही घडू तर द्या,
चला, मागेच आहे मी कुठे गाडी अडू तर द्या.
उतारा ना मिळाला तर फळ्याशी हात थरथरतो,
म्हणे सुविचार लिहिण्याला जरा हाती खडू तर द्या.
जरी भरपेट हादडले तरीही हाव सरते का?
म्हणाया लागले सारे जरा ढेरी झडू तर द्या.
मुखीचा घास हिसकोनी चरे सैराट महागाई,
जनांचा सूर रडवेला कुठे कानी पडू तर द्या.
त्वरेने सांत्वने येता हसोनी दुःख बोले की,
मनाला मोकळे करण्या मला आधी रडू तर द्या.
असे हा देश माझा पण तुझा तूही म्हणू शकतो,
लढा देण्या पुढे या पण मला पाठी दडू तर द्या.
२.
नव्या दगडास शेंदुर ह्या मला लावायचा नाही ;
मला हा देव गोट्याचा कधी पावायचा नाही.
तुझ्या पायांवरी डोके मला ठेवायचे आहे,
परंतू 'मी 'पणालाही धका लावायचा नाही.
स्वतः चालून आला तो, जरा त्याच्या कलाने घे;
तुझ्या जाळ्यात सहसा तो पुन्हा गावायचा नाही.
भुकेला भाकरीपुरता करी वाघ्या जरा गुरगुर,
तसा भुंकायचा नाही, कुणा चावायचा नाही.
बरा हा बाहुला माझा हले डोले रिमोटाने,
सरे चावी तिथे थांबे, पुढे धावायचा नाही.
जरी तू मायचा नवरा तरी ना बाप माझा तू,
दुरावा एवढा जाहिर मला दावायचा नाही.
................................
श्याम पारसकर
No comments:
Post a Comment