गझलाई : समकालीन गझलचे प्रातिनिधिक प्रतिबिंब : शिवाजी जवरे



                गझलचा इतिहास आणि तिचा देश-विदेशातून तसेच भाषानिहाय होत आलेला प्रवास ह्या गोष्टी आता सर्वपरिचित झालेल्या आहेत, असे समजण्यात कोणती अडचण नाही. आता गझलेच्या टप्प्यांची भलेही चर्चा ('विश्लेषण' शब्द काहीसा भारी होतो.) करता येईल. त्यापैकी नव्वदीपर्यंतची गझल आणि नंतर दोन हजार दहा नंतरची गझल असे टप्पे पाडता येतील. केवळ भटांच्या प्रभावात आणि गझलेला 'स्टार व्हेल्यूज' असल्याच्या भ्रमात असलेल्या काही लोकांनी नव्वदीपर्यंत गझलेत हात-पाय मारलेत. परंतु पुढे त्यांचे गझलेतील स्वारस्य उतरत गेले. मात्र कवितेत सांगायचे तर-

'झेलता श्रावण शिरवा मी कविता केली
सोसता भीषण वणवा मी कविता केली '

              अशी ज्यांची प्रकृतीच मुळात कविता करण्याची असते ते कविता लिहीतच राहतात. इथे कविता हे 'प्रतिक' आहे. खरे म्हणजे हा स्वधर्म आहे. 'मधुकर'पुस्तकातील एका लेखात विनोबा लिहितात एखाद्या बासरीवादकाला म्हणा की बाबा रे, तुला काय हवे ते देतो, पण तू हे तुझे बासरीवादन बंद कर, तर तो म्हणेल ''मी तिकडे दूर जाऊन वाजवीन, पण बासरी वाजविण्याविना मी राहू शकत नाही. '' तशी गझलचीच प्रकृती असलेल्या मोजक्या लोकांनी नव्वदीच्या आसपास लिहायला घेतलेली गझल सातत्याने पुढेही लिहिली. आणि म्हणून ती भटांच्या प्रभावाबाहेर पडून इ.स.दोन हजारनंतरच्या गझलेला येऊन भिडली. अर्थात, दोन हजार नंतरच्या नवीन लोकांसाठी प्रेरणा, किंवा आकर्षण म्हणून भटांची गझलच पुरेशी आणि समर्थ होती. त्यामुळे मधल्या म्हणजे 'नव्वदी ते दोन हजार दहा'च्या काळात जी सातत्याने लिहिली गेली त्या गझलला किती महत्व द्यायचे, द्यायचेच नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु एक गोष्ट मात्र नाकारता येणार नाही, की ती गझल भटांच्या प्रभावाबाहेरची गझल आहे. कारण दीर्घकाळ एक गोष्ट केली की प्रत्येकाला आपापला सूर सापडतो. हा 'आपला' सूर सापडला की निर्मितीप्रक्रीयेतील व्यक्तीपासून अलिप्त होण्याची कलाही साधली जाते. जसे की-

'फक्त मी बाजूस हटलो न् तिला वाट दिली
जा, तुम्ही शब्दच जुळवा मी कविता केली. '

                अशा प्रकारे 'आपली गझल' लिहिणारे लोक पुढेही लिहित गेलेत कारण त्यांना त्यांचा सूर  सापडला होता. त्याला आणखी एक कारण म्हणजे नव्वदीच्या आसपास समीक्षकांची गझलसंबंधी जी हेटाळणीपूर्वक विधाने येत होती, ती ह्या लोकांना, सावध करायला पुरेशी होती. सरसकट सर्व समीक्षकांची मते आकसातून आलेली आहेत, असे मानण्याऐवजी आपणास ती मते सावध करायला उपयुक्त असतील तर त्यांची उपयुक्तता तेवढी आपण टिपली पाहिजे. उदाहरणातून सांगायचे तर असे आपले वेगळेपण जपणाऱ्या लोकांमध्ये श्रीकृष्ण राऊत सर बरेच पुढचे, त्यानंतर श्याम पारसकर, व्यंकट देशमुख, चंद्रशेखर सानेकर, तिकडे मराठवाड्यात डॉ. अनंत ढवळे, वैभव देशमुख...ही माझ्या ध्यानात आलेली, राहिलेली नावे आहेत. ही वेगळी गझल लिहिणाऱ्या कवींमध्ये राऊत सर अधिक ज्येष्ठ, ह्याचा पुरावा म्हणजे भटांनी 'काफला' प्रकाशित केला तेंव्हा त्यात राऊत सर आहेत. त्यांच्यामागून आलेले आम्ही लोक, म्हणजे ज्यांच्या हातात आठ-आठ, दहा-दहा गझला असतील परंतु संकोच आणि बुजरेपणा ह्यामुळे आम्ही तिकडे लक्ष दिले नाही. तसेही 'काफला'मध्ये गझल प्रकाशित होणे न होणे ह्यासंदर्भात प्रसिद्ध व्यावसायिक, गुंतवणूक तज्ज्ञ आणि जनसेवक 'वॉरेन बुफे'चे एक विधान अत्यंत प्रत्ययी आहे. 

              "You can only find out who is swimming naked when the tide goes" कारण पुढे 'काफला'मधील अरुण सांगोळे, राऊत सरांसारखे लेखनात सातत्य टिकविणारे सोडले तर अन्य बहुतेक गझलकार आताशा कुठे दिसत नाहीत. अर्थात, आवश्यक नाही की कुणी एखाद्या कलेची जोपासना (आतून स्वारस्य नसतांनाही) करीतच रहावे. ज्यांनी स्वत: स्वत्वाचे भान ठेवले, वेगळेपणा जपला, त्यांनाच ही वैशिष्ट्ये दुसऱ्यांच्या निर्मितीत दिसली की ते दाद देतात. दोन हजार दहा नंतरच्या गझलकार कवींच्या लेखनातील वैशिष्ट्ये जी राऊत सरांनी नोंदलीत ती समीक्षक किंवा जाणकार म्हणवणाऱ्या काही लोकांच्या कशी लक्षात येत नाहीत,  ह्याचे नवल वाटते. आजच्या तरुण गझलकारांच्या गझललेखनासंबंधी मला राऊत सर हे एक धीर देणारे ठिकाण वाटते. कारण आधी मी इ.स.दोन हजार नंतरच्या गझलचे सावधपणे समर्थन करीत होतो. परंतु 'गझलाई' वाचल्यापासून मला माझाच असा 'हरिक' झाला की 'चला आपल्यालाही बरेच कळते बरे का ? ' कारण नवीन गझलकारांच्या शेरातील नाविन्य आणि अभिव्यक्ती कौतुकास्पद असल्याचे जे आपण २००५ पासूनच म्हणतो तेच राऊत सरांचेही म्हणणे आहे. कारण कुणी तरी मान्यताप्राप्त जाणकार ज्येष्ठ आपल्या मताशी समान असा ध्वनित करीत असेल तर तो अभिप्राय अधिक धीटपणे प्रकट करायला गळा मोकळा वाटतो. हे काम 'गझलाई'मधील लेखांनी केले आहे. सर्वच शक्य नाही, पण काही लेखांमधील काही शेरांचे आणि सरांनी केलेल्या निरूपणाचेही वेचे घेऊन अल्पसा आस्वाद घेऊयात. 

    'जमाना बडा खराब', आपण कसे निरागस ही गझलेतील पारंपरिक भूमिका (हमे तो लुट लिया मिल के हुस्न वालोने...) त्यागून काहीसा आत्मचिंतनाचा संकेत प्रतिष्ठित व्हावा अशा प्रकारे कमलाकर आत्माराम देसले ह्यांचे शेर घेऊन अत्यंत सकारात्मक असे आस्वादन सरांनी 'गझलाई'मधील पहिल्या लेखात केले आहे. 'देहाचे वय वाढू दे पण आपल्या मनाचे शैशव जपावे, भुई कशीही असू दे अंकुरण्याची आणि आकाशाचे चुंबन घेण्याची उर्मी असली की खडकावरही निर्मितीची हिरवळ उभी होते. '

         डॉ. सुनील अहिरराव, ह्यांच्या गझल शैलीचे वर्णन करतांना  राऊत सर म्हणतात 'सुरेश भटानंतर आज लिहिल्या जाणाऱ्या तिसऱ्या पिढीच्या मराठी गझलला आपल्या परंपरेचे उत्कट भान आले आहे.... ' राऊत सरांच्या ओळी सार्थकी लावणारा हा डॉ. अहिरराव ह्यांच्या गझलेचा मतला, शेर बघा -

'टीचभर ही भूक सांभाळी विठोबा  
जन्मभर होतीच आषाढी विठोबा '

'पारखोनी जरा तू भक्त आता
हे तुला विकतील व्यापारी विठोबा '

            बाहेरच्या शत्रूंशी तुम्ही लाख निपटून घ्याल हो, पण आपलं स्वत:चं काय? अशी प्रस्तावना असलेला  शेर नोंदून सरांनी सुप्रिया जोशींच्या गझलेची व्याख्या 'जीवनानुभवाच्या वाट वळणांनी तावून सुलाखून आलेली गझल... 'अशी केली.

'काल शेवटी शत्रूंची यादीच बनवली
नाव स्वत:चे लिहित गेले पूर्ण पानभर '

रुपेश देशमुखच्या काही शेरांचा आस्वाद घेतांना सर म्हणतात तो आशयाला साजेसे नेपथ्य देतो.

'कधी संयमी कधी अनावर आपण दोघे
हो-नाहीच्या उंबरठ्यावर आपण दोघे. '

            रुपेशच्या ह्या संग्रहावर मीही आस्वादक लेख लिहिला आहे. (म्हणजे राऊत सरांच्या खालोखाल मलाही कळते की कुणावर लिहावे आणि लिहू नये.)
मनीषा नाईकचा -

'उल्केपरी चल सोडते आकाश मी
तू काळजाचे एकदा लोणार कर '

                   हा शेर वाचून किंवा ऐकून माणूस आशयवैविध्याच्या चटक्यांनी किंवा विद्युत झटक्यांनी पागल नाही होणार ? आणि राऊत सर तरी ह्याला अपवाद कसे असतील?  आपण नको त्या संदर्भात 'ओव्हर सेन्सिटाईज' आणि नको तेथे 'डिसेन्सिटाईज' झालेलो आहोत अशी विचित्र अवस्था झालेल्या समाजाचे वर्णन दोन ओळीत मांडण्याची पूजा फाटे ह्यांची हातोटी  राऊत सरांनी नेमकी पकडली बघा-

'ज्यास बाजारात किंमत फार होती
तो फटका नेमका फुसका निघाला. '

श्याम पारसकर, ह्या दुसऱ्या पिढीतील कवीचा हे शेर बघा- 

'भुकेजल्यांची भणंग दिंडी उभी दिसे ती तुझ्याच दारी
अशा घडीला जरी न तारी म्हणू कसा आपला विठोबा ? '

श्याम पारसकर ह्यांच्या प्रसिद्धीपराङ्मुख व्यक्तिमत्वाची राऊत सरांनी घेतलेली दखल हे एक मौलिक काम आहे.

                'गझलाई'मध्ये राऊत सरांनी घेतलेला सुशांत खुरसाळेचा एक शेर मला ह्यासाठी अधिक प्रकर्षाने भावला, कारण मी 'मनाचे भूत' ह्या विषयावर एका दिवाळी अंकाच्या मागणीनुसार काही शेर लिहिले होते. त्या पुरस्कारप्राप्त गझलेतील एक शेर असा होता-

'मनाच्या 'कृष्णविवरा'शी अपेक्षांच्या किती राशी
मिळे ते शून्य होते अन् दिसे जे दूर ते मागे !

ह्याच आशयाची अभिव्यक्ती खुरसाळेने बघा किती प्रभावीपणे केली-

'जे मिळावे असे वाटते नेहमी   
ते मिळाल्यावरी वाटते का कमी ? '

सौ. वंदना पाटील ह्यांच्याही गझलेतील वैशिष्ट्ये गझलाईत आलेली आहेत-

'ना कुणाचा हात पाठी ना घराणे गाजलेले
माझियापासून झाला हा सुरु इतिहास माझा '

नाना बेरगुडे ह्या माणसाची शब्दांची मानगूट पकडून आपला आशय रसिकांच्या पुढ्यात मांडण्याची रांगडी तऱ्हा बघा-

'पाखरा  हे योग्य नाही पाखराने सांगणे
पिंजरा विरघळत नसतो पंख फडफडल्यामुळे '

ममता सिंधू ताई सपकाळ ह्यांनी तारुण्यातील परस्परांची फसगत बघा कशी पकडली.

'मला चोरून बघण्याचा नाको ना आव आणू तू
तुला मी पाहिले आहे मला निरखून बघतांना '

                राऊत सरांनी ही आणि अशी आजच्या गझलेतील कलाकुसर पकडली, नोंदली. ह्याला रसिकत्वाचा जिवंतपणा म्हणतात. अन्यथा आपण संपलो की अन्य सारे कसे अळणी म्हणून सुतक पाळणे, म्हणजे आपले औदासिन्य दुसऱ्यांच्या अंगणात मांडण्याचा करंटेपणा नव्हे काय? भोवतीच्या निर्मितीमधील हे कलावैभव, ही अभिव्यक्तीची उत्कटता, त्याच कलावंताला कळू शकते, उल्हासित करू शकते जो 'पुलं' च्या जाण्यावर हसण्याचे महत्व सांगणारी खालील 'विलापिका' लिहू शकतो-

'हसण्यावाचून जगी आपले कोणी नसते भाई
जगण्यासाठी आधाराला हसणे असते भाई

पैसाअडका, नाती-गोती, सगे सोयरे खोटे
मैत्र तेवढे हसण्याचे ते सच्चे दिसते भाई

ज्याला जमले हसणे त्याचे सुंदर झाले जगणे
आले नाही हसता त्याचे जगणे फसते भाई

वाण हसूचा छान जमवितोजगण्यासोबत सौदा
शिवले ज्याने ओठ त्याचे दुकान बसते भाई

लाख होऊ दे सभोवताली उजाड बाग-बगीचे
गाव फुलांचे मनात हसऱ्या अमुच्या वसते भाई '

                ह्या लेखात उल्लेख न झालेल्या अन्य सर्वच गझलकारांच्या रचनाही, एवढ्याच काव्यमूल्याने युक्त आहेत. ही उगीचची मनधरणी किंवा संपादनी नाही, राऊत सरांनी काय एरवी त्यांना आपल्या सदरात समाविष्ट केले असेल? माझ्या क्षमतेला आणि लेखाच्या लांबीला पडलेल्या मर्यादांमुळे काहींना सोडणे अपरिहार्य होते. त्यांच्यासंबंधी वाचकांना सूचना करतो की आपण स्वत: 'गझलाई' मिळवा आणि वाचा. त्यातून भटांच्या प्रभावानंतरची परंतु भटांना अभिप्रेत असलेल्या,ज्याच्या त्याच्या, प्रत्येकाच्या आपपल्या समकालीन गझलचा  उलगडा होऊ शकेल.

.
शिवाजी जवरे,बुलढाणा,                     
८०७६०९५३१२

............,.......................................

□ गझलाई : आस्वादात्मक समीक्षा लेखसंग्रह
□ लेखक : श्रीकृष्ण राऊत
□ प्रकाशन : सूर्यमुद्रा प्रकाशन, नांदेड
□ पृष्ठे : १०४
□ मूल्य : १२५
□ पुस्तकाकरिता संपर्क : ८६६८६८५२८८

                     

No comments:

Post a Comment