१.
मोडून संकटांना जाळून रांधले मी
खाऊन मीठ भाकर सौख्यात नांदले मी
गेला धनी निघोनी सोडून एकटीला
आयुष्य भोग म्हणुनी दुःखात रांगले मी
उध्वस्त होत गेले कोणी न सावराया
मग घुंगरू जगाचे पायात बांधले मी
त्या मैफलीत जेव्हा होते जळत उभ्याने
आणून प्राण कंठी बेभान नाचले मी.
ओलांडली कुणी जर ती संयमीत रेषा
दावून रुप सतीचे त्वेशात भांडले मी.
हृदयी नसे लबाडी ना भावना सुडाची.
होवून फूल भोळे निर्माल्य सांडले मी
याहून काय नशिबा घेशील तू परीक्षा
ये ओसरीत माझ्या ईमान टांगले मी
२.
बघा खोटी किती आहेत येथे आपुली नाती
नको तेथे कशी खातात काही माणसे माती
दिव्याने सांग ना कैसे लढावे अंधकाराशी
जिथे वारा करी दंगा सदा विझवायला वाती
जिते असता विचारेना कुणी कोणा जगामंधी
अरे मेल्यावरी मग कां तयांच्या आरत्या गाती
कधी अमुची खुपे छाया कधी देवासही बाधा
किती झाल्या बघा वैरी अम्हाला आमुच्या जाती
कधी दिसला कुणी गुंडा उभ्याने शेपटी झुकते
कश्याला दावता मग रे उगाचच आपली छाती
असा आला उबग आता लढावे प्राण लावोनी
फुटो गवतास भाले अन धरावे शस्त्र ते हाती.
३.
हातात डाव होता सांगू कसे कुणाला
तो मोडुनी निघाला भांडू कसे कुणाला
माझ्याच माणसांनी छळले असे मला की
घायाळ मीच झालो बोलू कसे कुणाला
ज्या डागण्या मिळाल्या देहासवे मनाला
डसतात डाग आता दावू कसे कुणाला
माझ्याच गाडग्याशी उरले न आज काही
भूके अनेक दारी वाढू कसे कुणाला
सारेच मित्र होते फसवून जे पळाले
मी एकटाच येथे शोधू कसे कुणाला
येतात तेच आता चुकलो असे म्हणाया
मी हा असा बिचारा टाळू कसे कुणाला
छळतात प्रश्न मजला झरतात मूक डोळे
माझेच आप्त सारे श्रापू कसे कुणाला
................................
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव. जि. जळगाव. (९४२३४९२५९३/९८३४६१४००४)
No comments:
Post a Comment