तीन गझला : धनाजी जाधव



१.

तिला ओढ होती, मला आस होती,
तिची भेट तेव्हा,किती खास होती!

उतारास कोणी,असो वा नसो पण,
तुझी साथ आई, चढावास होती!

कशी वाचवू मी, इथे इज्जतीला,
खबर यौवनाची, समाजास होती!

म्हणे विठ्ठलाची, तुम्हा साथ आहे,
हवस देणगीची, पुजाऱ्यास होती!

मला ती म्हणाली, पुन्हा एक होऊ,
पुन्हा भांडणे रोज हमखास होती!

दिले अन्न पाणी, तुला हा निवारा,
किती काळजी त्या, विधात्यास होती!

कुठे पावला रे तिला देव येथे,
तिची सर्व श्रद्धा दिखाव्यास होती.

२.

एवढी माझ्या मनाला, लागलेली खंत आहे,
मी कुणाचे गीत गाऊ, कोण येथे संत आहे ?

यज्ञ केले याग केले,पण तरीही जात नाही,
वेदना बहुतेक माझी, फार जातीवंत आहे!

मी जगाला जिंकण्याच्या, एवढ्या धुंदीत असता,
हे कसे विसरून गेलो, की मलाही अंत आहे!

हारतो माणूस येथे, नेहमी ज्याच्यापुढे ते
दुःख का सांगा गड्यांनो, एवढे बलवंत आहे,

जन्म दात्यांना सुखाने, सोबतीला ठेवणारा,
ईश्वराच्या संमतीने, तो खरा श्रीमंत आहे!

३.

सवय होत आहे मला श्वापदांची,
नको साथ आता कुण्या माणसांची!

नव्या यातनांना नको वाव आता,
करू वाहवाही जुन्या यातनांची!

कितीदा नव्याने .....इथे ऐकवावी,
कहाणी तुला मी तुझ्या दुःखितांची!

किती साल गेले तरी रोज शिवबा,
उडे धूळ माती तुझ्या पावलांची!

इथे रोज आम्हास इतिहास सांगे,
नका गय करू रे, कुण्या खाजव्यांची!

जरी कान डोळा, सुखाशी तुझ्या पण
खबर ठेवतो मी, तुझ्या आसवांची!

................................
धनाजी जाधव
7020264980,
तुळजापूर

2 comments: