दोन गझला : सौ. प्रज्ञा कुलकर्णी



१.

या मनाला शब्द जेव्हा भावले नव्हते
ठेवले राखीव पण मी खोडले नव्हते

स्वार्थ मोठा साधण्याला लाच दाखवली
दुर्जनाच्या सावलीला थांबले नव्हते

एक संधी सारखी हुलकावणी देते
श्रेष्ठ मार्गाच्या मतीला सोडले नव्हते

दामिनी भेदून गेली उंच झाडाला
खोड जळले पण मुळांनी सोडले नव्हते

स्वच्छ किरणांचा झरोका पाहिल्यावरती
प्रश्न पडला का धुळीला रोखले नव्हते

लग्न संस्थेला कशाला दोष देता हो
वाद तडजोडीतुनी का सांधले नव्हते

झाड मोफत देत आले पाखरांना घर
बघ निसर्गा गुण जगाने हेरले नव्हते

२.

माझी स्थिती समजून घे
जे शक्य ते मागून घे

मी राम की दानव कुणी
आधीच पडताळून घे

तू घाल सोन्याची ठुशी
अन् प्रेमही माळून घे

माझी भिती जर वाटली
विश्वास अजमावून घे

चिंता कशाची वाटते
ते एकदा बोलून घे

झाली तुला आहे जखम
माझी हळद लावून घे

वाटेल जेव्हा एकटे
माझी गझल वाचून घे
................................
सौ.प्रज्ञा कुलकर्णी
वसमत
जि.हिंगोली
मो -९६५७९४८३९४

5 comments:

  1. दोन्ही रचना खूप छान, माई !

    ReplyDelete
  2. अप्रतिम,गझल सखी, अर्थ ही खूप सुंदर ,सहज सुलभ, आकलानिय

    ReplyDelete
  3. छान 👌🏻👌🏻

    ReplyDelete