दोन गझला : रोहिणी पांडे


१.

उध्वस्त मुक्या डोळ्यांमधल्या‌ पाण्यावरती बोलू
चल आयुष्या आता आपण मरणावरती  बोलू

शय्येवरची फुले भोगती कुस्करलेल्या रात्री
पहाट वेळी थकलेल्या त्या गात्रांवरती बोलू

करंड्यातले‌‌ हळदी कुंकू सौभाग्याचे लेणे
फक्त एकदा कुंकू पुसल्या भाळावरती बोलू

काल चिमुकली पोटासाठी दोरी वरती चढली
बाप म्हणाला जगलो तर मग अन्नावरती बोलू

ठक्क कोरड्या नद्या जाहल्या,पाऊस म्हणे रुसला
दोन किनारे  हसत म्हणाले धरणावरती बोलू

ज्याला त्याला मुकुटावरती बघण्याची का घाई
अरे माणसा दिव्य अशा त्या चरणावरती बोलू

घाव अंतरी खोल जाहले कसे सहावे त्यांना
चल आता रे त्या घावांच्या भरणावरती बोलू

जर्जर झाल्या देहाच्या त्या आधाराला काठी
लेक म्हणाला आश्रमातल्या दारावरती बोलू

ओल्या फांद्या तुटलेल्या त्या कुजबुजल्या मग कानी
चला सख्यांनो आता आपण सरणावरती बोलू

२.

काळिज कातळ तुझे  वाटता,पाषाणावर हिरवळ दिसली
पाषाणाच्या हृदयामधली नदी बिचारी अवखळ दिसली

सुकून गेला वृक्ष कडेचा म्हणून कोणी घाव घातला
घाव घालत्या कुऱ्हाडीस त्या उगाच तेथे सळसळ दिसली

जखमेवरती खपली धरली व्रणही आता फिक्कट झाला 
कशी नेमकी आईला त्या जखमेमधली भळभळ दिसली

बंगल्यातल्या श्रीमंतीचे पार्टीमध्ये दर्शन घडले
कोपऱ्यातल्या खोलीमध्ये म्हातारीची अडगळ दिसली

पॉलिश करतो बूट पोरगा तिथेच त्याचे दप्तर दिसले
शिकण्यासाठी धडपडण्याची त्या पोराची तळमळ दिसली

श्रीमंतांच्या थाटामध्ये वस्तीमध्ये आला कोणी
दारिद्र्याच्या सोयरिकीची मनात त्याच्या मळमळ दिसली

2 comments: