चौकोनी अंबर : तरुणाईची गझल : अविनाश चिंचवडकर




भूषण कुळकर्णी हा आय.आय.टी. खरगपूर सारख्या ख्यातनाम संस्थेतून संगणक शास्त्रात पदवी घेतलेला एक मराठी तरुण ! सध्या तो कॅलिफोर्निया येथे एका प्रख्यात कंपनीत कार्यरत आहे. असा हा मराठी तरुण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मराठी गझलेचा मार्ग निवडतो ही खूपच आश्वासक गोष्ट आहे. मराठी गझल तरुणांच्या मनात पक्की रुजली आहे याचीच ही गोष्ट साक्ष देते. 

सुरेश भटांनी लावलेला गझलेचा हा वृक्ष आता चांगलाच डेरेदार झाला आहे. मराठी तरुण पिढी आपल्या स्वतंत्र अभिव्यक्तीमुळे या वृक्षाला अधिकच सशक्त करीत आहे. 
 
"चौकोनी अंबर" हा छोटेखानी गझल संग्रह महाजन पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी गझलशाळेच्या वतीने प्रकाशित केला आहे. गझलशाळा ही संस्था गझलेवर प्रेम करणाऱ्या काही गझलवेड्यांनी स्थापन केलेली संस्था आहे. या संस्थेने "चौकोनी अंबर" या संग्रहासोबतच एकूण चार गझलसंग्रह एकत्रितपणे प्रकाशित करून एक विक्रमच केला आहे. 

या संग्रहात ६४ गझला आहेत. या गझला वाचतांना एक गोष्ट जाणवते की या गझलांचा बाज वेगळा आहे, स्वतंत्र आहे. या नवीन गझलकारांचे जग वेगळे आहे, त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, त्यांचे अनुभव वेगळे आहेत. त्यामुळेच त्यांची अभिव्यक्ती सुध्दा वेगळी आहे आणि ही खूपच स्वागतार्ह बाब आहे. भटांनंतरची ही तिसरी पिढी सुध्दा मराठी गझलेच्या प्रेमात आहे हे मराठी गझलेचे यशच आहे. 

भूषण कुळकर्णी यांनी त्यांच्या गझलेत खूप वेगवेगळे विषय हाताळले आहेत.
हृदयावरचे ओझे हलके करण्यापुरते लिहितो
कठीण वेळी मी थोडेसे हसण्यापुरते लिहितो

आपण गझल का लिहितो याचे इतके सुंदर विवेचन खूप कमी गझलकारांनी केले असेल. हा तरुण कवी जीवनाचा किती सखोलपणे विचार करतो याचे प्रत्यंतर मग पुढच्या ओळीत येते.
प्रश्नपत्रिका आयुष्याची अवघड दिसते आहे
फारफार तर ढकलपास मी ठरण्यापुरते लिहितो

ती गेल्यावर जीवनातले गीत संपले होते
जे उरले ते तिला कधीतर कळण्यापुरते लिहितो 

अशा दाद घेऊन जाणाऱ्या ओळी पुस्तकात पानोपानी दिसतात. बहुतेक गझलांचे मतले लक्ष वेधून घेणारे आहेत. अनेक उदाहरणे देता येतील -
सर्व गावातल्या झोपल्या सावल्या
एक माझ्यातुझ्या जाहल्या सावल्या

थांबून मी घाव गोंजारले होते
तेव्हाच ते युद्ध मी हारले होते

एक नवा पर्याय गवसला
प्रश्न आणखी अवघड बनला

गझल ही फक्त शब्दांची वृत्तबद्ध जोडणी नको तर ती हृदयाला स्पर्शून जायला हवी, तरच त्या गझलेला प्रभावी गझल म्हणता येईल. भूषण कुळकर्णी यांना हे कसब चांगलेच साधले आहे असे म्हणायला हरकत नाही. 
चालण्याची सवय जडली, थांबणे विसरून गेले
पोचता शिखरावरी काहीतरी हरवून गेले

वेगळे आहोत आपण हे बरे झाले
माणसे आहोत आपण हे बरे झाले

हसण्यावारी कुणाच्या भाळू नकोस मित्रा
इतक्यात स्वप्न कुठले पाहू नकोस मित्रा

जितके अपुल्या कलेमधे ते मुरले होते
सादर केल्यानंतर तितके झुकले होते

असे अनेक मतले मनाला भिडून जातात.

भूषण कुळकर्णी यांना गझलशाळेत दत्तप्रसाद जोग, प्रशांत वैदय, वैभव वसंतराव कुळकर्णी, अश्विनी आपटे, उत्तरा जोशी, वैशाली माळी, चैतन्य कुलकर्णी, श्रध्दा खानविलकर यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे एखादी ओळ गुणगुणायची, लयीत येतील असे शब्द निवडायचे, आपला खयाल वेगवेगळ्या पध्दतीने मांडून शेर उंचीवर नेण्याचा प्रयत्न करणे, ही त्यांची निर्मितीप्रक्रिया असते आणि ती ते गझलशाळेतच शिकले. 

त्यांच्या "सांजवेळी" या गझलेला तर सुप्रसिध्द कवी वैभव जोशी यांनी मनापासून दाद दिली होती आणि लगेच सुप्रसिध्द संगीतकार श्रेयस बेडेकर यांनी त्या गझलेला चाल लावून ऐकवतात, हा कवीसाठी अविस्मरणीय अनुभव होता. बंगलोर येथील गायक आणि संगीतकार हृषिकेश मोघे यांनी सुध्दा त्यांच्या गझलांना चाली लावलेल्या आहेत. 

वैभव जोशी यांना विशेष आवडलेल्या त्यांच्या "सांजवेळी' या गझलेतील काही ओळी खालीलप्रमाणे आहेत.
क्षण ऊनसावल्यांचे सरतील सांजवेळी
सारेच सारखे मग दिसतील सांजवेळी

मिळतील चालताना कित्येक सोबतीला
जे कोण आपले ते कळतील सांजवेळी

शोधायला निघाले दाणे मनाप्रमाणे
घरट्याकडेच पक्षी वळतील सांजवेळी

घडल्यात ज्या चुका अन् जे साधता न आले
बाबी लहानमोठ्या छळतील सांजवेळी

मला या संग्रहातील काही गझला खूप वेगळ्या वाटल्यात. "रंग" ही अशीच एक गझल! आयुष्यातले प्रश्न कधीच सुटत नाहीत हे अतिशय सुंदरपणे मांडले आहे.
प्रश्न सुटले वाटले, पण नेहमी उरतात काही
उत्तरामध्ये नको त्या शक्यता लपतात काही

उंच शिखराचेच वर्णन मांडले आहे जगाने
की जणू कुठल्या यशाला पायऱ्या नसतात काही

अस्त झाला, मात्र त्याची राहिली इच्छा असावी
त्याच आवडत्या दिशेला रंग घुटमळतात काही !

किंवा खूप वेगळी अशी "सुरुवात' ही गझल पहा. आपल्याला बरेचदा असे वाटते की आपण काहीतरी नवे काहीतरी करीत आहोत. पण खरंतर आपण पूर्वी जे काही करीत होतो, तेच पुन्हा करीत असतो. हे सत्य खूप मोजक्या शब्दांत कवीने या गझलेत मांडले आहे. 
नवी सुरुवात होईल वाटले होते 
पुन्हा पहिलेच पाऊल टाकले होते

दिलासा चालताना लाभला इतका
कुणी वाटेत मागे थांबले होते

पुन्हा फाटून गेले पान लिहिलेले
कितीदा नाव एकच खोडले होते

जुने सत्यच नव्या शब्दात सांगितले
तुम्हाला वाटले, मी शोधले होते !

आणि पुस्तकाचे शीर्षक ज्या गझलेवर आधारित आहे ती "चौकोनी अंबर" ही गझल! 
वाढत जाऊ सरळ हे नंतर ठरले होते
आधी अंतर मुळांतले रुजल्यावर ठरले होते

एक रोजची खुर्ची अन् आवडती खिडकी होती
त्यातुन दिसणारे चौकोनी अंबर ठरले होते

अशाचसाठी विचारल्या नाहीत कुणाला शंका
सगळ्यांसाठी अपुले अपुले उत्तर ठरले होते

खडकावरती रुजलो याचे अता वाटते कौतुक
निघून जावे, असेही कधी क्षणभर ठरले होते

या अशा गझला वाचून कवीचे भविष्य उज्ज्वल आहे याची खात्री पटते, तसेच मराठी गझलेचेही भवितव्यही उज्ज्वल आहे याबद्दलही खात्री पटते!

*******************
अविनाश चिंचवडकर
बंगलोर
avinashsc@yahoo.com
मो. 9986196940

No comments:

Post a Comment