दोन गझला : संगीता म्हसकर


१.

वाटेत काय घडले सांगायचे कुणाला
गर्दीत चेह-यांच्या वाचायचे कुणाला

मी वर्ज्य सूर झाले गाण्यात आपल्यांच्या
या मैफिलीत आता थांबायचे कुणाला

भेटीत कोरड्या त्या बेचैन शब्द झाले
ते स्वप्न आर्जवांचे मागायचे कुणाला

गेली कुठे कळेना ? आई घरात नाही!
अंधार दाटतांना बिलगायचे कुणाला

विश्वास बाळगावा, येथे कसा कुणाचा?
भेटायचे कुणाला ?टाळायचे कुणाला?


२.

कुंद सकाळी मनात वादळ, डोळे कातर
पावसात या धुक्यासारखा तुझाच वावर

वाट वेगळी  झाली परंतु  हरकत नाही
जुन्या क्षणांच्या ओठांवरती उरली साखर

भेटीनंतर किती केवडा दरवळला तो
कथा आपली लिहिली होती त्या पानावर

तुझा चेहरा वाचत असते जेव्हा जेव्हा...
आठवतो मज तेव्हा तेव्हा अथांग सागर

पाठीवरती हात नेहमी लाभत नाही
स्वतः स्वत:च्या आयुष्याला आता सावर

No comments:

Post a Comment