तीन गझला : सुधाकर कदम

१.

काय होते रोज मजला कळत नाही
दुःखही आता जिवाला छळत नाही

काळजाचे सर्व कप्पे रिक्त असता
बावरे मन अजुनही का चळत नाही

नाक घासुन, पाय धरिले, पण तरीही
कोणताही नवस अपुला फळत नाही

जिंकलेली तू,तरी मी हारलो ना
कळुन सारे आपणा का वळत नाही

का?कशाला?पुजत जावे देव-देवी
माणसांचे मरण जर का टळत नाही

बालपण,तारुण्यही संपून गेले
दंभरूपी सुंभ पण हा जळत नाही

२.

सोसण्याचा सूर करणे ज्यास जमले
समजुनी घ्या त्यास जगणेही उमगले

काय महिमा तुकोबाच्या अभंगांचा
बुडविली गाथा तरीही शब्द तरले

माणसांची जात निपटारीच आहे
जिवलगांना तोलल्यावरतीच कळले

चाललो अंधार वाटेने जरी मी
पोचलो जेथे तिथे मग नभ उजळले

दुष्मनांशी लढत आलो जन्मभर,पण
त्यांत 'अपुले ' पाहुनी अवसान गळले

गैरसमजातून घडते खूप काही
म्हणुन का दाखल करावे उगिच खटले

३.

कुणीच नसते अपुले देवा
सगळे असती खाया मेवा

भले जयाचे करतो आपण
म्हणती पायी मस्तक ठेवा

सग्याचेच जे होत नसे रे
त्यांना दुसऱ्याचा ना केवा

खाऊ घाला त्यांना ताजे
शिळे नि पाके तुम्ही जेवा

प्रच्छन्नतेने सारे करुनी
पाप धुण्याला जाती रेवा

.................................
गझलगंधर्व सुधाकर कदम
8888858850

1 comment:

  1. क्या बात क्या बात सर!!

    ReplyDelete