१.
वाटे जरा जिवाला निःशब्द शांत व्हावे
सारे विचार आता मौनामध्ये विरावे
कोणी नकोच आता साथीस सोबतीला
वैराण माळरानी एकांतगीत गावे
निष्पर्ण झाड झाले सोसूनिया उन्हाळे
गेले निघून सारे घरट्यामधील रावे
नव्हताच सातबारा मी काढला कधीही
लिहिलेय पोरकेपण माझ्याच फक्त नावे
हृदयामधील श्रध्दा ज्याने सदाच जपली
तो देव विश्वकर्मा त्यालाच फक्त पावे
नाहीच राउळी तो बांधून ठेवलेला
माणूसकी जपे जो त्यालाच हो भजावे
'क्षितिजा 'मना विचारी सोसायचे किती मी ?
प्रारब्धभोग आहे जाणून हेच घ्यावे
२.
रिमझिम श्रावण तुझी आठवण
ती मनभावन तुझी आठवण
मुग्ध किशोरी बागडताना
छुन्नक पैंजण तुझी आठवण
जाग मंदिरी कीर्तन गायन
तशीच पावन तुझी आठवण
तळहातावर मेंदीचे बन
हृदयी गोंदण तुझी आठवण
नवरत्नांचा हार साजिरा
चपखल कोंदण तुझी आठवण
चांदणराती मदीर धुंदी
खळखळ कंकण तुझी आठवण
कविता,गझला...जमली मैफल
सुरम्य गायन तुझी आठवण
उनाड दिवशी भटकंतीवर
उन्मिलीत मन तुझी आठवण
सहली गप्पा...खळखळ हसणे
अन् सहभोजन तुझी आठवण !
स्मरता 'क्षितिजा ' हुरहुरते मन
अन् आक्रंदन तुझी आठवण
३.
बघ ,तिच्यासाठी कशा या बांधलेल्या चौकटी
या समाजाने तिच्यावर लादलेल्या चौकटी
सातच्या आतच तिनेही यायचे आहे घरी
या रुढीनेही तिच्या स्तव आखलेल्या चौकटी
ती प्रयत्ने मिळविते यश उंच झेपावे जरा
अन् तिच्या कर्तृत्वरेषी काचलेल्या चौकटी
पण कधी ती एकटी असते कधी ती संकटी
मग तिच्या साथीस हळव्या जागलेल्या चौकटी
तीच येते गौररूपे अन् घराला सौख्यदा
आतआतूनी मनातुन हर्षलेल्या चौकटी
एक सुखरुप स्वास्थ्य आहे या घरा-भिंतीमध्ये
जाणुनी घेती मनाला भावलेल्या चौकटी
अन् 'क्षितीजा' पार झेंडे लाविते नारी सदा
कौतुके करतात औक्षण जाणलेल्या चौकटी
..........................................
मीनल बाठे 'क्षितिजा'
.
No comments:
Post a Comment