दोन गझला : सुधा नरवाडकर




१.

उदो चालतो सर्व ठिकाणी सख्खे नाते पक्के असते
द्रौपदी नसे सख्खी भगिनी कृष्णासाठी शालू फाडते.

जगणे म्हणजे खेळामधला डाव रडीचा वाटे ज्याला
टाळूवरचे लोणी खातो जीवन त्याला सार्थ वाटते!

पर्वा नाही मला कुणाची आम्ही दोघे मजेत असतो
सांग कन्यके विना सोबती कसा साजरा उत्सव करते ?

आठवते मी गोड क्षणांना हरखुन जातो देहाचा कण
सख्या साजणा दूर असे तू सत्य उमगते मन काजळते


रोज रोज पण बाळाचे ह्या लाड किती गं करते आई?
कोंड्यावरची मुलगी म्हणुनी तुच्छ लेखुनी दूर ठेवते

पति-पत्नीचे नाते फुलते विश्वासाच्या पायावरती
काच एकदा भंग पावली पुन्हा कधीही सांधत नसते

जीवनभर तू शोषण केले धारेवरती सुनेस धरले
सरड्याने बघ रंग बदलले शोकाचे हे नाटक वठते

२.

पैसा आणिक स्वार्थासाठी आज लढाई जो तो करतो
स्वामीनिष्ठा जपण्यासाठी क्षणात बाजी प्राण सोडतो

विचित्र असतो मानव प्राणी कुसळ दुजांचे सहजच बघतो
स्वतःमधल्या मुसळासम ह्या दोषांना तो बघा विसरतो

कपडालत्ता,पैसा अडका वृद्धाला पण नकोच असतो
मधु बोलांची अन् प्रेमाची फक्त अपेक्षा उरी ठेवतो

सुट्टी मध्ये गावी येता फक्त चार दिन निवांत असतो
सीमेवरचा हुकूम येता हात धुवोनी त्वरित धावतो

रामासम मी तुला शोधतो सखे लाडके इकडे तिकडे
विरहाग्नीच्या डोही बुडता चांदणीत मी तुला पाहतो

गंडे झाले,दोरे झाले पितृदोष पण समाप्त झाला
मृत्युंजय जप घरी करवतो खरेच विधि का मरण टाळतो?

मद,मोहाने अंध होउनी माय पित्याला दूर ठेवले
कर्म फळेही कुणा न चुकली आश्रमात मी अता राहतो

1 comment: