१.
ही वाट जीवनाची कळली कधीच नाही
का वेळ शेवटीची टळली कधीच नाही
केली किती प्रतीक्षा हा श्वास सोडताना
का पावले तुझी पण वळली कधीच नाही
पाहून फायदे अन तोटे खुळ्या जगाचे
चादर तरी मनाची मळली कधीच नाही
संघर्ष जीवनाचा ना संपला कधीही
ती रात्र संकटांची ढळली कधीच नाही
जे अनुभवास आले होते जरी भयंकर
ती सल मनास माझ्या छळली कधीच नाही
२.
संपला संवाद आता ना कुणाशी बोलणे
दुःख सारे साहताना बेगडी का हासणे?
कोरडी नाती इथे, ना भावनेचा गारवा
आसवांना मोल नाही मग कशाला ढाळणे?
बंद दारे बंद खिडक्या श्वास येथे गोठला
पांगळ्या देहास नुसते घाव देता पोसणे
द्यावयाला लेकरांना घास आई कष्टते
भाकरी भाजून देता अन स्वतःला जाळणे
गोड कोणी बोलला तर स्वार्थ मग समजून घे
ध्यान बगळ्याचे असे ते योग्य संधी साधणे
बाप जगतो या जगी अन लेक येथे संपला
ना कुणाला साध्य झाले नियतीला टाळणे
मोह,माया,लालसा का दुःख देती मानवा
मार्ग सत्याचा मिळावा हेच आता मागणे
३.
कोणता आजार येथे माणसाला लागला
हा इथे अन् तो तिथे का आपसातच भांडला
आजही हृदयात त्याच्या राग लोभाच्या खुणा
ठेवुनी असले निखारे, अंतरी तो पोळला
भांडणानी जीव जाती काय घडते चांगले?
टाकली ठिणगी कुणी अन डाव कोणी साधला
शोधले मी माणसाला भेटला ना तो कुठे
माणसाच्या जाणिवेचा का झराही आटला?
श्वास आहे जोवरी हाती हवी ही लेखणी
सत्य सारे मांडण्याचा मार्ग माझा शोधला
.................................
छाया बैसाणे(सोनवणे)
जळगांव
मो 9284635108
छान
ReplyDeleteखूपच अप्रतिम आक्कासाहेब.
ReplyDelete