१.
मळल्या काही विरल्या काही कुजल्या काही
आठवणींच्या चिंध्या आता उरल्या काही
भळभळणाऱ्या जखमांशी का पटले नव्हते
उगाच मीही काढत नाही खपल्या काही
प्रकाश व्हावा इतपत मी पेटवल्या पणत्या
अंधाराच्या काठावरती विझल्या काही
जबाबदाऱ्या लाख पेलल्या खांद्यावरती
आयुष्याच्या मानगुटीवर बसल्या काही
घेत उन्हाला जगणे माझे बळकट केले
श्रेयासाठी धूर्त सावल्या उठल्या काही
२.
सावली शोषून घेते धग तुझी
काय कामाची उन्हा तगमग तुझी
लावल्यावर चेहऱ्यावर चेहरे
आणखी लपलीत दु:खे मग तुझी
पावसाशी बोललो,कळले मला
केवढी करतात चर्चा ढग तुझी
प्रेम आहे आटले समजू नको
काळजी करतात की जिवलग तुझी
आत आहे एवढे अंधारले
फक्त वरवरची कशी झगमग तुझी
मी ठरवतो सारखे विसरायचे
आठवण काढून देते जग तुझी
३.
घेतला आहे जरी वाटून त्यांनी
सूर्य नाही ठेवला झाकून त्यांनी
मुक्त केले ज्या क्षणाला पाखरांना
पाहिले नाही पुन्हा पलटून त्यांनी
काल वेड्यासारखा मी बोललो का?
लावले बोलायला जाणून त्यांनी
तू असा समजू नको की चोर नाही
पाहिले आहे तुला चोरून त्यांनी
तोंड त्यांचे पोळले होते कदाचित
ताकही बघ प्यायले फुंकून त्यांनी
मान्य असता आपला त्यांना पराभव
वाद नसता काढला उकरून त्यांनी
................................
गौतम राऊत, ब्रह्मपुरी, चंद्रपूर
८५५१८८६००९
तीनही सुंदर रचना
ReplyDeleteमनापासून आभार सर
Deleteमनापासून आभार सर
Deleteसुंदर तीनही
ReplyDeleteमनापासून आभार
Deleteभारीच!👌🏻💐💐
ReplyDeleteमनापासून आभार
Deleteआठवणींच्या चिंध्या आता उरल्या काही....वाह वा
ReplyDeleteकेवढी करतात चर्चा ढग तुझी....अप्रतिम
ताकही प्यायले बघ फुंकून त्यांनी .....खूप सुंदर
तिघंही गझला खूप सुंदर.....
मनापासून आभार जी
Delete