तीन गझला : डॉ. कैलास गायकवाड

१.

दुनिया आली माझ्यानंतर मीच अगोदर आहे 
मीच बरोबर होतो आणिक मीच बरोबर आहे 

कशास पुरवू डोहाळे वा केळवणाला जाऊ 
वांझ समजलो होतो इच्छा तीच गरोदर आहे 

नको दाखवू तोरा तुझिया अथांग खारटतेचा 
माझ्या डबक्यामध्येसुद्धा मानसरोवर आहे 

दुनिया करते कौतुक ... अर्जुन तरी न ठरतो उजवा 
तीर जयाचा चुकला तो निष्णात खरोखर आहे 

मला न पर्वा कोण असे वा नसेल खुर्चीमध्ये 
माझा हरेक पक्षामध्ये एक सहोदर आहे 

कसे कुणी कैलास म्हणावे दुनिया बदलत आहे? 
चूल जोवरी मातीची येथील घरोघर आहे 

२.

कोणते ओठी तयाच्या गीत असते 
फक्त हे त्याला तिला माहीत असते 

बायकोच्या मावते डोळ्यांत सारे 
केवढे जग आपले सीमीत असते 

कर्म राबत राहते ठरल्याप्रमाणे 
दैव तितके नेमके विपरीत असते 

बंगल्यांचे जाणवत अस्तित्व नाही 
गुंतलेले मन जुन्या चाळीत असते 

फक्त एका हासण्याने काय दिसते !
बायको साध्यासुध्या साडीत असते 

वागते विदुषी कुणी वेडीप्रमाणे 
अन समंजसपण कुण्या वेडीत असते 

धुंद होते धावते जित्राब इतके 
एक अत्तर राबल्या मातीत असते 

सर्वधर्मांच्या करीता प्रेम असते 
अन घृणा दुसऱ्यातल्या जातीत असते 

ती जरी दिसली तरी स्थितप्रज्ञ असतो 
फक्त धडधड तेवढी छातीत असते 

विठ्ठलागत भक्त नाही काळवंडत
विठ्ठलाची सावली वारीत असते 

मानधन कैलासचा उद्देश नाही 
मौज केवळ वाहवा टाळीत असते 

३.

मायच्या हातून अपुला मार चुकल्यासारखे 
वाटते आहे मनाला फार चुकल्यासारखे 

तू हसावे काळजावर वार केल्यासारखे 
मी हसावे काळजाचा वार चुकल्यासारखे 

मद्यशाळा मंदिरे मस्जिद विहारे चर्चही
धावते सर्वत्र दुनिया दार चुकल्यासारखे 

चित्र मूर्ती शिल्प तर बिनचूक सारी काढली 
पण भविष्याचा जरा आकार चुकल्यासारखे 

राजनीती संपली कैलास नाही  आपली 
पण कुणी उजवे नि डावे  यार चुकल्यासारखे 

................................
डॉ कैलास गायकवाड

2 comments:

  1. वाह वाह डॉक्टरसाहेब! तिन्ही गझला छान!
    - विजयानंद जोशी

    ReplyDelete
  2. खूप छान आहेत गजल .
    - संदेश गायकवाड

    ReplyDelete