तीन गझला : उमा पाटील

१.

तुला कोणत्या साच्यात बघू
चंद्रास कसे चंद्रात बघू

काल पाहिली ताटामध्ये
आज भाकरी स्वप्नात बघू

आरशामधे बघून झाले
जरा स्वतःच्या आत्म्यात बघू

शोध शेवटी थांबवू अता
फक्त एकदा हृदयात बघू

माझा संयम ढळतो आहे
नको ना असा डोळ्यात बघू

उजळत आहे नव्या दिशेने
पुन्हा कशाला शून्यात बघू

या जन्माची तर खात्री दे
पुढचे पुढच्या जन्मात बघू

२.

वाढण्याआधी दुरावा भांडणे मिटवून टाकू
एकमेकांशी मनाचे एकदा बोलून टाकू

सत्य ओठांवर मला तर आणता आलेच नाही
खूप वेळा वाटले की सर्वही सांगून टाकू

राजहंसाच्या प्रमाणे चल जरा वागून पाहू
सोडुनी पाणी व्यथेचे फक्त सुख प्राशून टाकू

लग्न दुसऱ्याशीच ठरले, काय मी आता करावे ?
तू दिलेली प्रेमपत्रे ठेवु की जाळून टाकू

अंतरामधल्या घराची स्वच्छता सुद्धा करूया
जळमटे चल आपल्या नात्यातली काढून टाकू

३.

गझल जेव्हा मनामध्ये रुजत जाते
गझल मग जीवनाचीही बनत जाते

कधी गुंतून जाते तर कधी सुटते
स्वतःला मी नव्याने सापडत जाते

तसे लवकर कळत नाही मनामधले
पुढे मग सोबतीने उलगडत जाते

सुखी असुनी जगामध्ये कुणी रडते
कुणी दुःखामधे सुद्धा हसत जाते

तुझ्यापासून आता दूर आले पण
जिथे जाते तुला का आठवत जाते ?

................................
उमा पाटील

No comments:

Post a Comment