तीन गझला : स्मिता राजू ढोनसळे



१.

अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते मित्रा
कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते मित्रा 

दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी
गीतेची त्या शपथ घालणे सोपे नसते मित्रा 

रोज वेगळे रूप घेउनी मृत्यू येतो दारी 
हसुनी त्याचे स्वागत करणे सोपे नसते मित्रा 

चेहऱ्यावरी कल्पकतेचा जरिही नकाब असला  
वास्तवतेचे दर्पण बघणे सोपे नसते मित्रा

पोपटपंची अफवांवरती चर्चा होते भारी
आयुष्याचे सत्य ऐकणे सोपे नसते मित्रा 

बरे वाटते हृदयामध्ये कुणीच नसते तेंव्हा
आठवणींना चाळत बसणे सोपे नसते मित्रा 

जात धर्म अन् पंथ वेगळा लाख असू दे भाषा
माणुसकीचे बंध जोडणे सोपे नसते मित्रा 

२.

चंदनापरी सदैव झिजणे मनात आहे
दरवळ पसरत सदा वाहणे मनात आहे

तळहाताच्या रेषांवरती नसे भरवसा
आयुष्याला सुंदर करणे मनात आहे

आयुष्याच्या वाटेवरती सगे सोयरे
प्रत्येकाला अपुला म्हणणे मनात आहे

येता जाता उंबरठा मज सांगत असतो
संस्काराचा पाया जपणे मनात आहे

पंख चिमुकले ध्येय गाठण्या धडपड करती
आधाराला सोबत असणे मनात आहे

तळहाताचा करुन पाळणा जपले ज्यांनी
त्या हातांना अविरत पुजणे मनात आहे

३.

माणुसकीने जगायचे पण जगता आले नाही
मनाप्रमाणे या देहाला झिजता आले नाही  

भाळावरचे गोंदण हिरवे आठवणींना सांगे
तुला जगाच्या हृदयामध्ये फुलता आले नाही 

अहंपणाची बांधत पट्टी अंधपणाने बसले
स्वच्छ मनाने कधी जगाला बघता आले नाही 

उगाच वाटे खंत मनाला कुणी कुणाचे नसते 
सारे अपुले होते तेंव्हा जपता आले नाही 

जरी जगाने पाय ओढले नव्या शोधल्या वाटा 
उमेद ठेवुन उगाच मजला रडता आले नाही 

बघता बघता उडून गेले श्वासामधले अंतर 
आयुष्याला कधीच अपुले म्हणता आले नाही 

ऐन दुपारी दुःख भेटले सौख्य महाली येता
दुःखालाही स्मितास हस-या छळता आले नाही
.................................
स्मिता राजू ढोनसळे
नान्नज जिल्हा -सोलापूर

4 comments: