१.
कास्तकारांच्या गळ्यांचा फास झालो
सावकारीची परीक्षा पास झालो
ज्या पिलांचे सर्व केले काळजीने
आज त्यांना मीच भारी त्रास झालो
पीक सारे नष्ट केले पावसाने
हिंमतीची मीच मग आरास झालो
लावली शेतात रोपे काळजीने
मात्र साऱ्या वेदनांचा तास झालो
दुर्गुणांनी पेरले वाटेत काटे
सद्गुणांचा मी तरीही दास झालो
पेटला वैशाख वणवा आसमंता
फाल्गुनाचा मीच तेव्हा मास झालो
पेरला मी गंध माझ्या वर्तनाने
मीच खात्री मी खरा विश्वास झालो
हात हाती घेतला मी रंजल्यांचा
गांजलेल्या माणसांची आस झालो
मी कितीही ढोंग केले मुक्ततेचे
मीच बंदी मीच कारावास झालो
गाठले त्यांनी मलाही काळरात्री
त्यागला मी देह,मी हर्रास झालो
२.
मोठा झालो तरी कुणाला छळता आले नाही
मला सुखावर कधी कुणाच्या जळता आले नाही
समोर डोंगर उभा राहिला आपत्तींचा माझ्या
तरी कधीही डोळ्यांमधुनी गळता आले नाही
केल्या त्यांनी लाख हिकमती जिंकायाला मजला
पीठ मनाचे माझ्या त्यांना मळता आले नाही
दिलेत हिरवे झेंडे त्यांनी प्रेमाला त्या माझ्या
त्या रस्त्यावर मला कधीही वळता आले नाही
कधी वाटले फिरून यावे दूर दूरच्या देशी
जबाबदारीतून कधीही पळता आले नाही
..........................................
प्रा. मोहन ज्ञानदेवराव काळे, अकोला
मो.७०३८२७६५५८
वाह!!क्या बात है
ReplyDelete