१.
असा का मांडतो आहे खुळा जागर घरासाठी
किती करतोस मित्रा तू इथे मरमर घरासाठी
जरी तू आणली रेती विटा गिट्टी नवा लोहा
असा का बांधल्या जातो खरा आदर घरासाठी
तुला तर पाहिजे होता सुखाचा बंगला शहरी
म्हणूनी काढले विक्री जुने आखर घरासाठी
हमाली,नोकरी,धंदा श्रमाचे हे जरी साधन
भुकेला पाहिजे असते घरी भाकर घरासाठी
जिथे नाही तिथे तू तर निवारा शोधतो आहे
जगाने ढापला आहे किती सागर घरासाठी
गुहेचा आसरा होता कधी काळी निवाऱ्याला
अता तू कोरला आहे उभा डोंगर घरासाठी
२.
दिसतो नभात सुंदर विश्वात हा तिरंगा
ठेवा चला गडे हो प्राणात हा तिरंगा
जाती जमात सारे एकात्म पावलेले
नव्हता कुठेच तेव्हा भेदात हा तिरंगा
फाशी हसून चढले स्वातंत्र्य वीर सारे
इतका भिनून होता श्वासात हा तिरंगा
आंदोलने उपोषण हत्यार क्रांतिकारी
स्वातंत्र्य आणले त्या घोषात हा तिरंगा
लावा घरी तिरंगा इतकेच भान ठेवा
ठेवा सदैव अपुल्या मानात हा तिरंगा
३.
भेगाळल्या भुईचा दुष्काळ पाहिल्यावर
डोळे भिजून गेले आभाळ पाहिल्यावर
मी टाळणार होतो वारी तुझी विठोबा
बघ,पावले निघाली ते टाळ पाहिल्यावर
कुत्रे फिरून गेले घेण्यास जीव त्याचा
तो वाघ मी जरासा घायाळ पाहिल्यावर
करतात लोक हल्ले कळपात रोज आता
खोटाच लावलेला तो आळ पाहिल्यावर
घेऊ तयास आम्ही काखेत सज्जनाला
हाणू तसेच रट्टे नाठाळ पाहिल्यावर
नाही म्हणून गेली झटक्यात तीच आता
अवतार हाच माझा भैताळ पाहिल्यावर
मी चांगला गडे हो माणूस चांगल्यांशी
विक्रम बनून जातो वेताळ पाहिल्यावर
येतात लगबगीने रानामधून गाई
होते तसेच मजला ते बाळ पाहिल्यावर
खूप छान कीबू
ReplyDeleteखूपच सुंदर रचना
ReplyDelete