तीन गझला : विजया टाळकुटे


१.

पान जिवाचे इच्छेशिवाय कोरे एखादे
तसे जन्मते शब्दांशिवाय गाणे एखादे

हवीहवीशी कोय निसटते झरकन आंब्याची
तसे निसटते हातांमधून नाते एखादे 

पुन्हा फिरून मूळ ठिकाणी येत राहते ना?
वाढू शकते असले भांडण छोटे एखादे 

प्रेमामध्ये पडल्यानंतर जग सुंदर दिसते
शहाण्याहून सुखात असते वेडे एखादे 

ऐक सापळा सोडवताना वेळ अशी येते
शिका-यासही सावज करते  जाळे एखादे

२.

सोड,मागचा विषय राहिला मागे
काढ,आपला विषय राहिला मागे

शांत माघार कुणी घेतली नाही 
पुढे, नांदता विषय राहिला मागे

भरकटलेले सर्व पळाले मुद्दे
फक्त एकटा विषय राहिला मागे 

मधे बोलली एक खाजरी शंका
आणि नेमका विषय राहिला मागे

लेकुरवाळे काम वाढले इतके
तुझा विठोबा विषय राहिला मागे

पुन्हा एकदा गाडी सुटून गेली
पुन्हा एकदा विषय राहिला मागे

वर्गात जशी 'कळी' देखणी आली 
तसा 'कळीचा' विषय राहिला मागे

चहा सोबती खूप रंगली चर्चा
मात्र चांगला विषय राहिला मागे

तू आवडते! कुठे सांगता आले?
मूळ तेवढा विषय राहिला मागे

३.

ऐकू नाही येत तरीही वाजत आहे थंडी
सांग कुणाच्या तालावरती नाचत आहे थंडी?

इतकी इतकी शहारते की शब्द फुटेना काही 
नव्या नवेल्या नवरीगत का वागत आहे थंडी?

दुःख,निराशा यांना आता लाव नवी जा काडी 
होळीभवती बघू कुणावर शेकत आहे थंडी?

फक्त सुखाच्या घोटाला या नाही म्हणवत नाही 
प्याल्यासोबत गरम चहाच्या नांदत आहे थंडी

शब्द मुकाही, गझल गुलाबी, मिठी शराबी देतो !
आमंत्रण मन विनातिकिट हे धाडत आहे थंडी 

प्रेमामध्ये पडली आहे जणु बिछान्याच्या ती
दुपार झाली उठली नाही लोळत आहे थंडी 

रागाचाही पारा आता शून्यावरती आला 
मनास सुद्धा शाली टोप्या घालत आहे थंडी!


1 comment: