Showing posts with label विजयानंद जोशी. Show all posts
Showing posts with label विजयानंद जोशी. Show all posts

तीन गझला : विजयानंद जोशी

१.

पेटवायची आग थोडिशी असे शेवटी ठरले
पेटवल्यावर त्यांच्यासह मग बरेच काही जळले!

जशी अचानक कुठून पडली सत्याची ती ठिणगी
जंगल नंतर सर्व भ्रमांचे जळत त्यामधे बसले

उत्तर देण्यासाठी म्हणून तोंड उघडले जेव्हा
सैन्यच खुनशी प्रश्नांचे तुटुनी त्याच्यावर पडले!

काय आणखी दिले तुम्हाला म्हणजे पटेल खात्री?
रक्तातिल चैतन्य तेवढे आहे शिल्लक उरले!

उगवलो इथे आणि मिसळेन इथल्या मातीमध्ये
कुठे विचारत आहे पण मातीला मी काय दिले?

२.

एक नवे घरटे आधी शोधू आपण
त्यानंतर अपुला पक्षी शोधू आपण

गंभीर किती वक्ता जे सांगत होता
तरी कशी टाळी पडली शोधू आपण

कोंडलोत चारी बाजूंनी या जागी
असतिल त्या अदृश्य फटी शोधू आपण

प्रेमहि करते, खच्चुन भांडण माझ्याशी
कोण नेमकी तुझ्यातली शोधू आपण

जिने आणले नकळत या भोवर्‍यामधे
बुडण्यापूर्वी ती होडी शोधू आपण

दंगल मोठी...राख शेवटी ठरलेली
कोणाची पहिली काडी शोधू आपण

जळून गेली सगळी स्वप्ने अन् इच्छा
कुणी तिची फुंकली विडी शोधू आपण

३.

कोण जाणे काय म्हटले त्या क्षणाला;
नेमके मग काय घडले त्या क्षणाला

जर मला पटवून कोणी सांगते तर
घट्ट मी असते पकडले त्या क्षणाला

हे नसे काही नव्याने बाधलेले
हे असावे खूळ जडले त्या क्षणाला

एकदा भेटायचा होता दिलासा
रद्द झाले अन् बिघडले त्या क्षणाला

तोल सोडुन बोलला पुष्कळ तिला तो
आणि नाते हाय तुटले त्या क्षणाला

जो खुला पर्याय दिसतो तो स्विकारा
फक्त इतके मी सुचवले त्या क्षणाला

गैर नक्की फायदा घेणार दिसले
मत जुने मग मी बदलले त्या क्षणाला

वाटले जेव्हा धरावा घट्ट आता
दोन हातांनी जखडले त्या क्षणाला