Showing posts with label रवीन्द्र जवादे. Show all posts
Showing posts with label रवीन्द्र जवादे. Show all posts

दोन गझला : रवीन्द्र जवादे


१.

कुणा सांगू,कसे सांगू,तुझी ती याद आली तर
समेवर दुःख विरहाचे अशातच दाद आली तर.

उभा हा जन्म डागाळे भ्रमाचे रक्त मुरताना
पुन्हा पाऊल का थांबे जराशी साद आली तर.

किती घंटी नकाराची,कसे ते तर्कही खोटे
कधी मग ठाम निश्चीती जरा अपवाद आली तर.

कशी भांगात मातीच्या दिसे ती आग वणव्याची
ढगांची नेमकी मस्तीच सालाबाद आली तर।

२.

दुःख माझ्या आवडीचे फार आहे
ही सुखाची लाघवी तकरार आहे

बाँब,कसला तोफखाना,युध्द कोठे
धर्म जाती हेच तर औजार आहे

जन्म आहे जाहला मग का पळावे
हेच जगणे स्वर्गमय संसार आहे!

हे मनातुन काढ आता मायबापा
फक्त मुलगा शेवटी आधार आहे

काळजाला लावतो डावावरी का
प्रेम इथला देखणा व्यापार आहे!

भूक कैसी,दंगलीचा म्होरक्या हो
चालते रे आपले सरकार आहे
                      
.................................         
रवींद्र जवादे,
शब्दश्री,भट्टड ले-आऊट,
समतानगर,मूर्तिजापूर.
जि.४४४१०७
मोबा-९४२०७०८०२६