१.
भेटून काय सांगू माझी व्यथा कुणाला
मी एकटाच दु:खी, आनंद या जगाला
ही मंदिरे उगाची आहेत बांधलेली
दगडात देव नसतो पटते अता मनाला
देवासमान श्रद्धा, मी ठेवली तुझ्यावर
तू वेगळी निघाली सोडून या जिवाला
गादी असे पिलांना, घरट्यात कापसाची
पण फाटकीच चादर मजला निजावयाला
तुजला सुखे मिळावी म्हणुनीच यत्न केले
सर्वस्व त्याचसाठी मी लावले पणाला
भीती कधीच नव्हती होणार काय माझे
विश्वास ठाम होता जिंकेन मी स्वत:ला
२.
विद्वान सर्व येथे, नाही कुणी अडाणी
शिवराळ मग कशाला, येते मुखात वाणी?
माजू नकोस मित्रा, छोट्या तुझ्या यशाने
उध्वस्त जाहलेली, मी पाहिली घराणी
बंधुत्व भावनेचा, असतो जयांस पुळका
येथे सदैव त्यांची, मी ऐकतो ग-हाणी
जर गायचे तुला तर, तू प्रेमगीत गावे
आनंद मैफलीला, देते कुठे विराणी?
गांधी विचारधारा, आली फळास दिसते
सरलेत गावचे या, खटले पहा दिवाणी
विकृत भावनांचा, दुर्गंध फार येतो
देते सुगंध मजला, रात्रीत रातराणी
राबू किती अताशा थकलेत गात्र माझे
माणूस मी शहरचा, नाही कुणी लभाणी
आला मला न ध्यानी तव खेळ हा प्रितीचा
मुर्खात काढुनी मज, तू जाहली शहाणी
३.
चिंधीचे मी साप केले
सांगा कुठले पाप केले?
अडले होते काम माझे
गाढवास मी बाप केले
फसलो होतो -कर्म माझे
सुटकेसाठी जाप केले
वजनी होते नाव रे, पण
हलके त्यांनी माप केले
मोठ्या मोठ्या मी बलांचे
छोटे छोटे काप केले
क्रोधीतांचे शाप होते
शापांचे उ:शाप केले
किती नाचती उंदरे ही
त्यांचेसाठी चाप केले
बोलायाला लोक नव्हते
गझलेशी आलाप केले
.................................
अनिल जाधव
अमरावती
94228 57060
सुंदर गझला
ReplyDeleteखूप सुंदर
ReplyDelete