तीन गझला : चंद्रकांत धस


१.

मुद्दाम टाळले की करतात वार दुःखे
गोंजारता तयांना होतात यार दुःखे

मी एकटा तरीही मी एकटा न येथे
दुःखात सोबतीला असतात चार दुःखे

आजन्म साथ देण्या त्यांनी करार केला
माझ्यावरी कधीची झाली उदार दुःखे

आकांत केवढा तो करतात लोक वेडे?
असतात एवढी का वाईट फार दुःखे?

गेला खचून जेंव्हा आधार जीवनाचा
तेंव्हाच सांत्वनाला आली चिकार दुःखे

दुःखासवे सलोखा आजन्म ठेवला मी
याचेच दुःख आता देती नकार दुःखे

मृत्यूस मी अखेरी कवटाळले सुखाने
अंती निरोप द्याया जमली हजार दुःखे

२.

काळजाच्या पार होतो का?
शब्द माझा धार होतो का?

पाझरावी लागते माया
व्यर्थ कोणी यार होतो का?

लेकरे मोठी जरी झाली
जीव माझा घार होतो का?

तू फुलांना ओव प्रेमाने
टोचल्याने हार होतो का?

अंत माझा चिंतिला का रे?
मी कुणाला भार होतो का?

घातल्याने वस्त्र खादीचे
देशप्रेमी फार होतो का?

लोकसेवा धर्म मानी जो
मारल्याने ठार होतो का?

३.

कोहळा घेऊन तू आवळा देऊ नको
तू भ्रमाचा तेवढा भोपळा देऊ नको

नेमके का ठेवले बोट तू वर्मावरी?
व्यर्थ हे आव्हान या वादळा देऊ नको

मोडला कित्येकदा तू दिलेला शब्दही
शब्द तू आता मला मोकळा देऊ नको

जन्म हा काढायचा आपल्याला सोबती
तू मला आधार तो पांगळा देऊ नको

मी कुठे नाकारले लाघवी प्रेमा तुझ्या?
फक्त तो मोहातला सापळा देऊ नको

गोठल्या संवेदना, वेदना माझ्यातल्या
घाव तू आता मला कोवळा देऊ नको

राहिली भोगायची पाप-पुण्याची फळे
जन्मही देवा मला वेगळा देऊ नको

.................................
©चंद्रकांत धस
निगडी,पुणे
मो.९९७०४५२५२५

11 comments: