तीन गझला : अश्विनी बोंडे


१.

जन्मभराची वणवण आहे
मरण मिळाले आंदण आहे

वरवर दिसते दडपण आहे
टोपीखाली कारण आहे

तुझ्या आतले मी जर कोंदण
तू पाचूचे चांदण आहे

फिक्कट झाली ललाटरेषा
श्वास उद्यावर तारण आहे

झिरप गोठल्या डोळ्यांमधुनी
बाकी रोजच रणरण आहे

फुंकरीत चल उडवू सारे
दु:ख धुळीचे कणकण आहे

दिव्यत्वाची प्रचिती येण्या
दिव्य ठेवले गाभण आहे

२.

सकाळ माझी दवात न्हाली
तुझी गुलाबी मिठी मिळाली

मिठीत शिरता नवीन होते
तुझी नि माझी जुनी खुशाली

मनात माझ्या तरंग उठले
मिठीत जितके तुझ्या बुडाली

तुझ्या मनाच्या तळात गेले
तुझी नितळता तिथे कळाली

तुझा भरवसा, म्हणून केले
मनास माझ्या तुझ्या हवाली
 
३.

भावनांची तिने टाकली पुस्तके
कायद्याची नवी आणली पुस्तके

अर्थ जो पाहिजे तोच तू लावला
संशयाने पुन्हा जाळली पुस्तके

स्वच्छ पानास चुरगाळले, फाडले
शब्द काहीच ना बोलली पुस्तके

फार उपचार केले तरी ना कळे
वाळवीने कशी कोरली पुस्तके 

जन्मभर खूप सांभाळले, वाचले 
काल सरणावरी ठेवली पुस्तके

संग्रही ठेउनी अर्थ लागेल का
रोजही पाहिजे चाळली पुस्तके

चेहरा वाचला, वाचले मन तुझे
त्यास का पाहिजे वाचली पुस्तके 

2 comments: