तीन गझला : ओंकार बजागे



१.

रस्ता बिकट जरी हा मी चालतो कधीचा
डोई जुनीच स्वप्ने मी वाहतो कधीचा

सत्यात स्वप्न येण्या लढतो जरी मनस्वी 
पाढाच अपयशाचा मी वाचतो कधीचा

पुन्हा न भाळण्याचे फसतात डाव सारे
फसव्याच घोषणांना मी भाळतो कधीचा

छळतो जरी मला हा ग्रीष्मातला उकाडा
संवाद गारव्याशी मी टाळतो कधीचा

संसार वादळाशी थाटून घेतला पण
हे भक्ष्य वादळाचे मी जाहलो कधीचा

होऊन स्वप्न माझे दारी वसंत यावा
ठेवून आस ध्यानी मी जागतो कधीचा 


२.

बदलला तू हा अचानक सूर कोठे?
नीयती ही आज झाली क्रूर कोठे?

आजवर ना काढले तू नाव माझे, 
हा अचानक आसवांचा पूर कोठे?

सांत्वनाचे शब्द ना कानी पडावे,
एवढाही मी जगाच्या दूर कोठे?

दारही ना उघडले तेव्हा घराचे,
एवढी निष्ठा तुझी भरपूर कोठे?

जाणले ना तू कधीही भाव माझे
एवढा मी वाटतो मग्रूर कोठे?

भासते तू दावणीची गाय कोठे?
भासतो का मी जरा निष्ठूर कोठे?

मांडली सारी व्यथा गझलेत मी पण
शेर माझे जाहले मशहूर कोठे?

३.

उरी वेदनेचा निखारा कशाला?
तुझ्या आठवांचा पसारा कशाला?

किती वाहतो व्यर्थ चिंता उद्याची
नशीबी ग्रहांचा पहारा कशाला?

दिले दुःख तू ,मी विसरलो कधीचा
अता व्यर्थ खोटा निवारा कशाला?

स्वत: ते किती खात आहे पिकाला
अशा कुंपणाचा पहारा कशाला?

विसरलो अताशा तुझे शब्द जहरी
पुन्हा तो तहाचा इशारा कशाला?

मना ऐक ना रे, नको प्रेम पुन्हा
सदा तो भितीचा शहारा कशाला?

जरा मांडतो दुःख गझलेत माझ्या
सदा आसवांचा सहारा कशाला?

.............................
ओंकार बजागे

No comments:

Post a Comment