दोन गझला : विनोद बुरबुरे


१.

तुझे मोल आता कळू लागले बघ
दिशेने तुझ्या ते वळू लागले बघ

गुलामीत सारे जरी रोखलेले
तुझी हाक येता पळू लागले बघ

जिणे संकटाचे विनाशाप्रमाणे
तुझ्या लेखणीने टळू लागले बघ

तुटू लागल्या जात-पाती अशा की
मनूचे मढेही जळू लागले बघ

लळा गौतमाचा इथे पेरण्याला
निळे रक्त हे सळसळू लागले बघ

न वाली कुणीही तुझ्या कारव्याला
जुने पान आता गळू लागले बघ

कराया निघाले जगाचे भले जे
गळा फास का आवळू लागले बघ

२.

झालो महाड -पाणी,आता उठाव होतो
व्याकूळल्या जिवांच्या ओठी तलाव होतो

कोणावरी भरोसा करतो समाज माझा
दो चार भाषणांनी का भीमराव होतो ?

मी झेलतो जरीही लाखोत वार त्यांचे
खोलात काळजाच्या माझ्याच घाव होतो

जयभीम हाक देता अंधारल्या दिशांना
घेऊन मशाल हाती एकत्र गाव होतो

गेली किती युगेही माझ्यावरून ऐसी
मी सर्व त्या युगांचा झाला पडाव होतो
.................................
विनोद बुरबुरे
यवतमाळ
मो.9096708377

No comments:

Post a Comment