तीन गझला : स्मिता गोरंटीवार



१.

रोज लिहिते मला बोलली डायरी
एकदा वाच तू आपली डायरी

भांडण्याचे नको एक कारण पुन्हा 
याचसाठी तिने फाडली डायरी 

येत गेली कधी सावली जीवनी 
अन उन्हावर पुन्हा भाळली डायरी 

अंतरी दाटलेल्या किती भावना
लांबली, खूप विस्तारली डायरी

अत्तराला निमंत्रण नको द्यायला 
प्रेमपत्रात गंधाळली डायरी

वाढदिवसास त्याने सदिच्छा दिली 
तारखेवार हाताळली डायरी

ज्यात मी कल्पनेची दिली आहुती 
वास्तवाने किती पेटली डायरी

२.

मी पुन्हा थांबेन जर ती यायची आहे
शेवटाची पालखी उचलायची आहे 

ह्या उठाठेवी पुरे नाठाळ लोकांनो
ऐतखाऊंना उपरती व्हायची आहे

विठ्ठला वारीमधे संवादतो आहे 
खूप घाई  भेटल्यावर यायची आहे

लावली समई तिन्हीसांजा जशा झाल्या 
रात्र दिवसाशी मला सांधायची आहे

पाहतो माझी सहनशक्ती किती आता 
ही विनाकारण कुशी पलटायची आहे

चेतनेचा स्रोत होउन एकदा पाहू 
नाव माझी पैलतीरी न्यायची आहे 


३.

खुणावते क्षितिजाची  किनार आज मला
करायचा उडण्याचा विचार आज मला 

तुझ्यामुळे कळली राजरोस प्रेम निती
पचेल काय तुझा हा नकार आज मला

करायचा असतो हा परोपकार मुला
कळेल माणुसकी बारबार आज मला

जगात रोज दिखावा मला सहज दिसतो  
कसा कळेल भ्रमाचा प्रकार आज मला

विचार हे भडकाऊ...तुझेच ठेव तुला
नकोस अक्षर बोलू चकार आज मला

तुला कुठे जिवना सांग मी कसे पकडू 
करायची जिवनाची शिकार आज मला

अता खुळे मन माझे तुझ्यावरी बसले
मिळायचा नजराणा चिकार आज मला 

............................
स्मिता गोरंटीवार

3 comments: